मुंबई: भारतीय क्रिकेटर स्मृती मानधना आणि संगीतकार पलाश मुच्छल यांच्या विवाहाची चर्चा सर्वत्र रंगली होती. 23 नोव्हेंबर 2025 रोजी हा विवाह सोहळा पार पडणार होता, मात्र ऐन लग्नाच्या आदल्या दिवशी काही ‘नाट्यमय’ घडामोडी घडल्या आणि पाच वर्षांच्या प्रेमाच्या नात्यात मिठाचा खडा पडला. आता या वादावर पडदा पडणार असल्याची चिन्हे दिसत आहेत.

स्मृती आणि पलाश यांच्या लग्नाची जय्यत तयारी झाली होती, पण ऐनवेळी स्मृतीच्या वडिलांची प्रकृती बिघडल्याचे कारण सांगून सोहळा थांबवण्यात आला. मात्र, खरी ठिणगी तेव्हा पडली जेव्हा स्मृतीचा मित्र माने याने पलाशवर खळबळजनक आरोप केले. पलाशला दुसऱ्या एका महिलेसोबत आक्षेपार्ह स्थितीत रंगेहात पकडल्याचा दावा मानेने केला होता. यामुळे दोन्ही कुटुंबांत मोठी कटुता निर्माण झाली होती.

पाहा व्हिडीओ:

दरम्यान, मुंबईतील एका पॉश रेस्टॉरंटबाहेर स्मृतीचे वडील श्रीनिवास मानधना स्पॉट झाले. विशेष म्हणजे, त्यांच्यासोबत पलाशची बहीण, सुप्रसिद्ध गायिका पलक मुच्छल आणि तिचा पती मिथुन देखील होते. यावेळी पलकने स्मृतीच्या वडिलांच्या पाया पडून आशीर्वाद घेतल्याचे दिसून आले. दोन्ही कुटुंबांमधील ही जवळीक पाहून त्यांच्यातील जुने वाद मिटले असून पुन्हा एकदा लग्नाची बोलणी सुरू झाल्याचे तर्क लावले जात आहेत.
जर दोन्ही कुटुंबे एकत्र येत असतील, तर हे नातं एका नव्या वळणावर पोहोचण्याची शक्यता आहे. मात्र, अद्याप स्मृती किंवा पलाशकडून अधिकृतपणे कोणतीही स्पष्टोक्ती आलेली नाही.







