अहमदनगर : मंत्रालयात नोकरीला लावण्याचे आमिष दाखवून बेरोजगार तरुणाची ५ लाख रूपयांची फसवणूक केल्याप्रकरणी राहुरी पोलिसांनी तीन जणांना अटक केली आहे. तर धक्कादायक बाब म्हणजे या प्रकरणात सैराट फेम प्रिन्स अर्थात अभिनेता सुरज पवार याचाही सहभाग असल्याचे समोर आले आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
दत्तात्रय आरुण क्षिरसागर (रा. दत्तनगर, मालेगाव बस स्टॅप नाशिक), आकाश विष्णु शिंदे आणि ओमकार नंदकुमार तरटे (दोघेही रा. संगमनेर) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी महेश बाळकृष्ण वाघडकर (रा. भेंडा, ता. नेवासा) यांनी राहुरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महेश वाघडकर यांना मंत्रालयात नोकरी लावण्याच्या आमिषाने वरील तीन आरोपींनी ५ लाख रूपयांची फसवणूक केली होती. याप्रकरणी पोलिसांनी वरील तीन आरोपींना अटक केली आहे.
दरम्यान, अटक आरोपींनीची कसून चौकशी केली असता, या फसवणूक रॅकेटमध्ये सुरज पवार याचेही नाव समोर आले आहे. त्यामुळे राहुरीचे पोलीस लवकरच सूरज पवार याला अटक करणार असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांनी दिली.