पुणे : अभिनेता रितेश देशमुख दिग्दर्शित सिनेमा ‘वेड’ ची बॉक्स ऑफिसवरील यशस्वी घौडदौड थांबण्याचे नाव घेत नाही .सिनेमाचा गल्ला ४० कोटींच्या पलीकडे गेला असून, तिसऱ्या आठवड्याची सुरुवातही धमाकेदार झाली आहे.
जिनिलिया-रितेश स्टार असलेला ‘वेड’ ३० डिसेंबर २०२२ रोजी प्रदर्शित झाला होता. आता तिसऱ्या शुक्रवारी अर्थात पंधराव्या दिवशी वेडने १.३५ कोटींची कमाई केली. या कमाईनंतर वेडचा आतापर्यंतचा एकूण गल्ला ४२.२० कोटींचा झाला आहे. दरम्यान शनिवार-रविवारी यापेक्षाही अधिक कमाई होऊन ४४ कोटींपर्यंत रितेशच्या ‘वेड’ सिनेमाची कमाई पोहोचेल, असा अंदाज बांधला जातोय. तरण यांनी केलेल्या ट्वीटमध्ये ‘वेड’चे कलेक्शन वीकेंड असल्याने आणखी वाढेल असेही म्हटले. त्यांनी ‘वेड’ची कामगिरी ‘रॉक-स्टेडी’ असल्याचेही नमुद केले.
रितेश-जिनिलिया या महाराष्ट्राच्या लाडक्या जोडीने विविध टेलिव्हिजन शो, रिअॅलिटी शो एवढंच नव्हे तर महाविद्यालयं, मुलाखती याठिकाणी उपस्थित राहत वेडचे प्रमोशन केले. याचाच परिणाम बॉक्स ऑफिसवर पाहायला मिळतो आहे. प्रदर्शनानंतर दुसऱ्या रविवारी वेडने ५.७० कोटींचा गल्ला जमवला.
दरम्यान, एखाद्या मराठी सिनेमाने एका दिवसात केलेली ही सर्वाधिक कमाई आहे. एवढी रक्कम बॉक्स ऑफिसवर एका दिवसात जमा करत वेडने ‘सैराट’चा रेकॉर्ड मोडला. दरम्यान रितेशने त्याचाच हिट सिनेमा ‘लय भारी’चाही एक रेकॉर्ड मोडला. रितेशच्या सर्वाधिक कमाई करणाऱ्या सिनेमांमध्ये ‘लय भारी’ अव्वल होता. आता ही जागा ‘वेड’ने घेतली.