पुणे : मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांची तब्येत अचानक खालावली असून त्यांच्यावर मागील १५ दिवसांपासून पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरु आहे.
अभिनेते विक्रम गोखले यांनी गेल्याच महिन्यात ३० ऑक्टोबर रोजी ८२ वा वाढदिवस साजरा केला. त्यानंतर काहीच दिवसात अभिनेत्याच्या तब्येतीविषयी चिंताजनक माहिती समोर आली आहे. विक्रम गोखले यांनी टीव्ही सीरियल, बॉलिवूड, मराठी सिनेमांमध्ये अनेका भूमिका गाजवल्या आहेत.
अभिनेते म्हणून त्यांची एक वेगळी ओळख आहे. सिनेमांमध्ये मिळेल त्या भूमिकेला योग्य न्याय त्यांनी आज वर दिला आहे. त्याचा मोठा चाहता वर्गही आहे. मात्र घशाच्या त्रासामुळे त्यांनी नाटकातील अभिनयात संन्यास घेतला आहे.
सध्या विक्रम गोखले ‘तुझेच मी गीत गात आहे’ या स्टार प्रवाहवरील मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आले होते. मालिकांविषयी बोलायचे झाल्यास काही वर्षांपूर्वी आलेली त्यांची स्टार प्रवाहची मालिका ‘अग्निहोत्र’ विशेष गाजली होती. या मालिकेत विक्रम यांनी साकारलेले मोरेश्वर अग्निहोत्री हे पात्र आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे.
दरम्यान, विक्रम गोखले यांना २०१३ साली प्रदर्शित झालेल्या अनुमती या चित्रपटातील अभिनयासाठी राष्ट्रीय पुरस्काराने गौरवण्यात आले. तसेच त्यांना चित्रपती व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कारानेही सन्मान करण्यात आले आहे.