दिवंगत अभिनेते रविंद्र महाजनी यांना 2020 या वर्षासाठी मरणोत्तर व्ही.शांताराम पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. यावेळी मुलगा आणि अभिनेता गष्मीर महाजनी याने वडिल रविंद्र महाजनी यांचा हा पुरस्कार स्विकारला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. वरळी येथील डोम, एनएससीआय ( नॅशनल स्पोर्टस क्लब ऑफ इंडिया) येथे गुरुवारी (22 फेब्रुवारी) सायंकाळी 6.30 वाजता 57 वा राज्य चित्रपट पुरस्कार सोहळा पार पडला.
रविंद्र महाजनी यांच्या शिवाय यावेळी 2021 साठी ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाण आणि वर्ष 2022 साठी ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाईक यांचा व्ही. शांताराण पुरस्काराने गौरव करण्यात आला आहे.
काही दिवसांपूर्वी रविंद्र महाजनी यांच्या पुण्यातील तळेगाव-दाभाडे येथील राहत्या घरात वयाच्या 77 व्या वर्षी त्यांचे निधन झाले. त्यांच्या मृत्यूनंतर अनेक गोष्टींवर चर्चा देखील झाल्या. यामध्ये विशेषत: गष्मीरचा मुलगा म्हणून भूमिकेवर अनेकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. पण नंतर त्यांनी माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेनंतर बऱ्याच गोष्टींचा उलगडा झाला. रविंद्र महाजनी यांनी त्यांच्या अभिनयाच्या जोरावर कलाक्षेत्रात रसिकांच्या मनावर राज्य केले. त्यांच्या या कार्याचा गौरव करत महाराष्ट्र सरकारकडून त्यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.
‘मुंबईचा फौजदार’मधून मनामनावर राज्य केलं
रवींद्र महाजनी यांनी प्रामुख्याने मराठी, हिंदी आणि गुजराती चित्रपटांमध्ये अभिनय केला आहे. 1975 मध्ये व्ही. शांताराम दिग्दर्शित झुंज या मराठी चित्रपटाद्वारे त्यांनी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. त्यांनी भूमिका साकारलेले लक्ष्मी (1978), दुनिया करी सलाम (1979), गोंधळात गोंधळ (1981), मुंबईचा फौजदार (1985) हे चित्रपट विशेष गाजले. रविंद्र महाजनी यांनी दिग्दर्शक आणि निर्माता म्हणूनही काम केलं आहे. त्यांनी 1997 साली प्रदर्शित झालेल्या सत्तेसाठी काहीही या चित्रपटासाठी दिग्दर्शक म्हणून काम केलं होतं. तसेच, या चित्रपटाची निर्मीतीही त्यांनीच केली होती.
रविंद्र महाजनींचा प्रवास उलगडणार
रविंद्र महाजनी यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी माधवी महाजन यांनी आपले आत्मचरित्र लिहिले असून त्याचे प्रकाशन झाले आहे. या आत्मचरित्रात रविंद्र महाजनी यांचा मुलगा आणि अभिनेता गश्मीर महाजनी याने वडिलांबाबतच्या हृदयद्रावक आठवणी सांगितल्या आहेत.