बीड : बीड जिल्ह्याच्या धारूर तालुक्यातील भोगलवाडीचा टिकटॉक स्टार संतोष मुंडेचा विजेचा झटका लागून मृत्यू झाल्याने नातेवाईक व ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. महावितरणचे अधिकारी व कर्मचारी यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नसल्याची भूमिका ग्रामस्थांनी घेतली आहे. त्यामुळे महावितरण आणि ग्रामस्थ यांच्यातली वाद चिघळण्याची चिन्हे आहेत.
संतोष का एक टिकटॉक स्टार होता, इंस्टवर त्याचे लाखो चाहते आहेत. त्याच्या दुर्दैवी मृत्यूने सर्वत्र हालहाल व्यक्त केली जात आहे.
याबाबत मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार संतोष व बाबुराव मुंडे हे दोघे जनावरांना घेऊन शेतात जात होते. त्यावेळी विजेच्या रोहित्राजवळ गेलेल्या जनावरांना परत आणण्यासाठी गेलेल्या बाबुराव मुंडे यांना उघड्या डीपीचा झटका बसला. यामुळे बाबुराव मुंडे यांना वाचविण्यासाठी गेलेल्या संतोषला देखील विजेचा तीव्र झटका बसल्याने त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.
संतोष राहात असलेल्या भोगलवाडी गावात डीपीचे अनेक तारा उघड्या असल्याची तक्रार ग्रामस्थांच्या वतीने यापूर्वी देखील करण्यात आली होती. मात्र महावितरणने याची दुरुस्ती केली नव्हती. यामुळेच विजेच्या तारांचा झटका लागल्याने संतोषाचा मृत्यू झाल्याचा आरोप ग्रामस्थ करत आहेत. त्याबरोबरीने दोषी अधिकारी व कर्मचारी यांच्यावर गुन्हा दाखल होईपर्यंत संतोषाचा मृतदेह ताब्यात घेणार नसल्याची भूमिका ग्रामस्थांनी घेतली आहे. याबाबत महावितरणने त्यांची अधिकृत भूमिका अजूनही स्पष्ट केलेली नाही.