पुणे : देशभरात सध्या श्रद्धा वालकर हत्याकांड प्रकरण चर्चेत आहे. या धक्कादायक प्रकरणाने देश हादरला आहे. मुंबईमध्ये राहणारी आफताब अमीन पूनावाला नावाच्या मुलाने आपली प्रियसी श्रद्धा वालकरची गळा दाबून हत्या केली आणि त्यानंतर तिच्या मृत शरीराचे 35 तुकडे करुन छतरपूरमधील जंगलामध्ये वेग-वेगळ्या ठिकाणी फेकून दिले. यावर चित्रपट दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांनी टि्वट करीत संताप व्यक्त केला आहे. अभिनेत्री स्वरा भास्करने देखील ट्वीट करत या हत्याकांडावर संताप व्यक्त केला होता.
श्रद्धा वालकर हत्या प्रकरणात आरोपी आफताब अमीन पुनावाला अजूनही सातत्याने पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहे. आफताबचे असत्य सातत्याने समोर येत आहे. मात्र त्याने इतक्या चलाखपणे हत्या केली आहे की, कोर्टासमोर हे सिद्ध करण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे.
“श्रद्धाचा आत्मा परत यायला हवा आणि त्याचे 70 तुकडे करायला हवे. या प्रकारच्या हत्यांना केवळ कायद्याच्या भीतीने रोकू शकत नाही. परंतु पीडित व्यक्तीचा आत्मा परत येऊन आणि हत्या करणाऱ्याला मारुन टाकेल कर नक्कीच हे थांबवले जाऊ शकेल. मी देवाकडे प्रार्थना करतो की, त्यांनी यावर नक्कीच विचार करावा”,असे राम गोपाल वर्मा यांनी आपल्या टि्वटमध्ये म्हटलं आहे.
आफताब मुंबईमधील एका कॉल सेंटरमध्ये काम करत होता. श्रद्धा आणि तो 2019 पासून लिव्हइनमध्ये राहत होते आणि यावर्षाच्या मध्यावर हे दोघे मुंबईहून दिल्लीला आले होते. लिव्हइनमध्ये राहिल्यानंतर श्रद्धा आफताबला लग्नाबाबत मागणी करत होती. त्यामुळे दोघांमध्ये वारंवार भांडण व्हायचे. आफताब अनेकदा श्रद्धाला मारहाण देखील करायचा.
काही दिवस आधी आफताबने श्रद्धाची गळा दाबून हत्या केली. त्यानंतर त्याने एक फ्रिज खरेदी केला आणि श्रद्धाच्या मृत शरीराचे 35 तुकडे करुन ते फ्रिजमध्ये ठेवले. त्यानंतर छतरपूरच्या जंगलामध्ये आफताबने वेग-वेगळ्या ठिकाणी ते फेकून दिले. पोलिस सध्या या तुकड्याचा शोध घेत आहे.