(Satish Kaushik Death ) मुंबई : हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते, निर्माते, दिग्दर्शक सतीश कौशिक( Satish Kaushik )(वय-६६) यांचे आज गुरुवारी (ता.९) पहाटे निधन झाले आहे. याची माहिती अभिनेते अनुपम खेर यांनी ट्विट करून दिली आहे. त्यांच्या निधनामुळे बॉलिवूडवर (Bollywood ) शोककळा पसरली आहे.
सतीश कौशिक यांच्या मृत्यूचे कारण आले समोर…!
सतीश कौशिक ( Satish Kaushik ) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्याचे वृत्त आहे आणि त्यावेळी ते दिल्ली, एनसीआरमध्ये होते. त्यांचा मृतदेह गुरुग्राममधील फोर्टिस रुग्णालयात नेण्यात आला असून शवविच्छेदनानंतर मृतदेह मुंबईला आणण्यात येणार आहे. वृत्तानुसार, कौशिक गुरुग्राम येथे एका नातेवाईकाला भेटण्यासाठी गेले होते आणि इथेच त्यांची प्रकृती खालावली. गाडीत असतानाच त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यांना वाचवण्याचे शर्थीचे प्रयत्न झाले, पण झटका इतका मोठा होता की सतीश कौशिक यांचे प्राण वाचू शकले नाही.
अनुपम खेर यांनी ट्विट करून दिली माहिती,
मृत्यू हे या जगाचं अंतिम सत्य आहे. हे मला माहीत आहे. पण माझ्या हयातीत माझा अत्यंत जवळचा मित्र सतीश कौशिक बाबत मी ही गोष्ट लिहील याचा मी स्वप्नातही विचार केला नव्हता, असं अनुपम खेर यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. आमच्या ४५ वर्षाच्या मैत्रीला अचानक असा पूर्णविराम लागला आहे. हरी ओम शांती. आता सतिश शिवाय आयुष्य पुन्हा पूर्वी सारखं राहणार नाही, अशी मनातील घालमेलही अनुपम खेर यांनी या ट्विटमधून व्यक्त केली आहे.
सतीश कौशिक यांचा जन्म १३ एप्रिल १९५६ मध्ये हरियाणाच्या महेंद्रगड येथे झाला. सतीश कौशिक यांनी दिल्लीच्या करोलबागमध्ये आपले शिक्षण घेतले. त्यानंतर दिल्ली विद्यापीठाच्या करोडीमल कॉलेजमधून त्यांनी पदवी घेतली. त्यानंतर त्यांनी नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये प्रवेश घेतला. १९७८मध्ये तिथून ते पास झाले आणि त्यांनी फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियात शिक्षण घेतले.
सतिश कौशिक यांनी आपल्या करिअरची सुरुवात १९८३ मध्ये आलेल्या जाने भी दो यारो या सिनेमातून केली होती. त्यानंतर त्यांनी १००हून अधिक सिनेमात काम केलं. १९९३मध्ये त्यांनी रुप की रानी चोरों का राजा या सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे. सतीश कौशिक यांची मिस्टर इंडियातील भूमिका सर्वाधिक गाजली. त्यांना दोन वेळा बेस्ट कॉमेडियनचा फिल्मफेअर पुरस्कारही मिळालेला आहे. अभिनेता गोविंदासोबतचा त्यांचा कॉमेडीचा टायमिंग अफलातून असायचा. त्यांच्या छोट्या भूमिकाही प्रेक्षकांच्या कायम लक्षात राहायच्या.
मनोरंजन संदर्भातील अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
या आठवड्यात मनोरंजनाचा डबल धमाका ; OTT वर चित्रपटांसह वेब सीरिजसुद्धा प्रदर्शित होणार
मनोरंजन विश्वाला मोठा धक्का; कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांचे निधन
दिल क्यों मेरा शोर करे गाण्याचे प्रसिद्ध गीतकार नासिर फराज यांचे निधन!