पुणे : २३ सप्टेंबर १९८८ रोजी मराठी सिनेसृष्टीच्या इतिहासात एक सोनेरी पान जोडले गेले. याच दिवशी राज्यात सर्वत्र ‘अशी ही बनवाबनवी’ हा सिनेमा प्रदर्शित झाला. याला आज ३४ वर्ष पूर्ण झाली. एवढी वर्ष उलटली तरी या सिनेमाची जादू आजही कमी झालेली दिसत नाही.
या सिनेमांतील संवाद अनेकांना तोंडपाठ आहेत. आज या सिनेमाला ३४ वर्ष पूर्ण झाली आहेत. चौतीस वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या या सिनेमातील संवादांवरून आजही मिम्स बनवले जातात. यातील प्रत्येक डायलॉग, गाणी ही प्रेक्षकांच्या अगदी तोंडपाठ असतील. काळ सरला तरी या चित्रपटाचा चाहतावर्ग कधीच कमी होणार नाही.
यातील प्रत्येक पात्राने आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. यातील संवाद ऐकून आजही चेहऱ्यावर हसू येतं. या चित्रपटाचे किस्सेही तितकेच मजेशीर आहेत. असाच किस्सा अभिनेते अशोक सराफ यांनी एका मुलाखतीत सांगितला होता. सेटवर त्यांनी चुकून म्हटलेला एक डायलॉग तुफान हिट ठरला.
राहायला घर मिळावं यासाठी चित्रपटात लक्ष्मीकांत बेर्डे आणि सचिन पिळगावकर हे दोघं स्त्री वेशांतर करतात. स्त्री वेशांतर केल्यावर लक्ष्मीकांत बेर्डे हे पडद्यावर अशोक सराफ यांच्या पत्नीची भूमिका साकारतात. घरमालकीणीला पत्नीची ओळख करून देताना अशोक सराफ हे चुकून ‘हा माझा बायको पार्वती’ असं म्हणतात. हा डायलॉग डोळ्यांसमोर आला तर आजही प्रेक्षक पोट धरून हसतात.
पण तुम्हाला माहितीये का, अशोक मामांनी म्हटलेला हा डायलॉग खरंतर लिहिलेला नव्हता. पडद्यामागे अशोक मामा हे लक्ष्मीकांत यांच्याशी ज्याप्रकारे बोलतात, त्याच ओघात डायलॉग बोलताना ते पटकन ‘हा माझा बायको पार्वती’ असं म्हणून जातात. दिग्दर्शकांनीही तो संवाद बदलला नाही आणि पुढे जाऊन तोच संवाद तुफान गाजला.
दरम्यान, लिंबूचं मटण’, ‘धनंजय माने इथेच राहतात का?’, ’७० रुपये वारले’ असे या चित्रपटातील अनेक संवाद आजही प्रेक्षकांना तोंडपाठ आहेत. काही चित्रपट वारंवार पाहिले तरी त्यातली मजा कधीच कमी होत नाही, असाच काहीसा अनुभव ‘अशी ही बनवाबनवी’ चित्रपट पाहताना येतो.