युनूस तांबोळी
Gautami Patil News : शिरूर : नृत्य व कला क्षेत्रात गौतमी पाटील व माधुरी पवार यांनी महाराष्ट्रात नावलौकीक कमवला आहे. लोकनाट्य तमाशा मंडळांनी देखील यांच्या कार्यक्रमांचा धसका घेतल्याचे पहायला मिळत आहे. तरूणाईने अल्पावधीतच यांचा कार्यक्रम डोक्यावर घेतला. आपल्या कलेच्या जोरावर सोशल मिडीयाच्या माध्यमातून या दोघींनी आपला चाहता वर्ग निर्माण केला. कालांतराने सबसे कातील, गौतमी पाटील… म्हणून गौतमी घराघरांत लोकप्रिय झाली. मात्र, नृत्यांगना माधुरी पवार हिने गौतमीच्या नृत्यावर आक्षेप घेत तिच्यावर टीका केली. सोशल मिडीयाच्या माध्यमातून एकमेकींवर चिखलफेकही झाली. हा वाद वाढतच गेला. अखेर अभिनेता व निवेदक सुभाष यादव यांनी मैत्री दिनाचे औचित्य साधून गौतमी व माधुरी यांच्यातील वाद संपुष्टात आणला. त्यामुळे यादव यांचे सोशल मिडीयावर कौतूक होत आहे.(Gautami Patil News)
सोशल मिडीयाच्या माध्यमातून या दोघींनी आपला चाहता वर्ग निर्माण केला.
गौतमी पाटील व माधुरी पवार… या दोन प्रसिद्ध नृत्यांगना, दोघींच्याही नृत्याचा पॅटर्न वेगवेगळा. मध्यंतरी प्रसार माध्यमांमार्फत दोघींनीही आपली एकमेकींविषयीची परस्परविरोधी मते व्यक्त केली. तेथून वादाची एक मोठी ठिणगी पडली. दोघींचाही नृत्य क्षेत्रातील चाहता वर्ग खूप मोठा आहे. महाराष्ट्रभर दोघींच्या चाहत्यांचे एकमेकींबद्दलचे ट्रोलिंग, चिखलफेक, मतमतांतरे यामुळे सोशल मीडियावर वातावरण तापले होते. अल्पावधीत त्यांना मिळालेली प्रसिद्धी ही कला क्षेत्रातील अनेकांसाठी संधी देणारी ठरत होती. चांगली बिदागी मिळू लागली होती. यात्रा, जत्रा, ऊरूस यांच्या माध्यमातून त्यांच्या कार्यक्रमाला अधिक मागणी येत होती. या शिवाय वाढदिवस, सण, उत्सव व उद्घाटनाच्या कार्यक्रमांना देखील कला दाखविण्याची संधी त्यांना मिळत होती. मात्र, वादाची ठिणगी पडल्यामुळे त्यांच्या कार्यक्रमांमध्ये एकमेकींवर चिखलफेक होऊ लागली. यांच्यातील वाद कोण मिटवणार, असा प्रश्न निर्माण झाला होता.(Gautami Patil News)
याचदरम्यान, हडपसर येथे टिओस कॅफेच्या उद्घाटनप्रसंगी रविवारी (ता. ६) नृत्यांगना गौतमी पाटील व माधुरी पवार एकाच व्यासपीठावर आल्या. त्यांच्यासमवेत कला क्षेत्रातील अनेक कलाकार एकत्रित आले होते. अखेर प्रसिद्ध निवेदक व अभिनेता सुभाष यादव यांनी पुढाकार घेत दोघींमध्ये समेट घडवून आणला. कला क्षेत्र मोठे आहे. आपण फक्त या कलेची सेवा करायची असते. कलाकारांमध्ये निकोप स्पर्धा जरूर असावी; मात्र, वाद नसावा, असे सांगत यादव यांनी मैत्री दिनाचे औचित्य साधत दोघींना मैत्रीच्या पवित्र बंधनात अडकवले. मैत्रीचा धागा हातावर बांधत दोघींनीही एकमेकींची गळाभेट घेतली. वाद मिटून मनोमीलन झाल्याने दोघींनीही आनंद व्यक्त केला. यादव यांचेही सर्वत्र कौतूक होत आहे.(Gautami Patil News)
दोघींच्या मनोमीलनानंतर यादव यांनी प्रतिक्रीया व्यक्त केली. यादव म्हणाले की, दोघींची मैत्री होऊ शकत नाही, असे म्हणत एका अभिनेता मित्राने माझ्यासोबत चक्क दहा हजार रुपयांची पैज लावली होती. पण मी देखील हार मानणारा नव्हतो. दोघीही समजूतदार असल्याने त्यांचे मनोमीलन होऊ शकते, यावर माझा विश्वास होता. दोघी एकाचवेळी स्टेजवर आल्या त्यावेळी वातावरण तणावपूर्ण होते. सर्वांनी बोलून दाखवलेल्या शक्यता खऱ्या होतील असं क्षणभर वाटलं होतं. परंतु तसं काही होण्यापूर्वीच दोघींशी व्यवस्थित संवाद साधून समेट घडवून आणली, याचा आनंद वाटतो.(Gautami Patil News)
छोटा पुढारी म्हणजेच घनःश्याम दरोडे आणि गौतमी पाटील यांच्यामधील वादही याच मंचावर समेट घडवून मिटवले. छोटा पुढारीने देखील ‘गौतमी ताई’ असा उल्लेख करून वाद मिटवण्यास प्राधान्य दिले. विशेष म्हणजे छोटा पुढारीला आवर्जून गौतमी पाटीलच्या शेजारचीच खूर्ची बसण्यासाठी राखीव ठेवली होती, असे यादव यांनी या वेळी सांगितले.(Gautami Patil News)