मुंबई : ऑस्करसाठी निवडलेल्या गुजराती ‘छेल्लो शो’ या चित्रपटात बालकलाकाराची भूमिका साकारणारा अभिनेता राहुल कोळी (वय-१०) याचे रविवारी (ता.९) निधन झाले आहे. चित्रपट प्रदर्शित होण्याच्या काही दिवस आधी त्याच्या निधनाने सर्वांनाच जबर धक्का बसला आहे.
राहुल कोळी हा ल्युकेमिया (कर्करोग) या आजाराने ग्रस्त होता. त्याला उपचारासाठी अहमदाबादमधील कॅन्सर रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. रविवारी ९ ऑक्टोबरला राहुलचा ताप वाढला. त्याला रक्ताच्या उलट्या सुरू झाल्या. आणि त्याची कर्करोगाशी सुरु असलेली झुंज अखेर संपली.
राहुल कोळीच्या वडिलांनी सांगितले की, गेल्या काही दिवसांपासून राहुलला सतत ताप येत होता. तसेच त्याला रक्ताच्या उलट्याही होत होत्या. राहुलचा एक खास चित्रपट तीन दिवसांनी प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. मात्र, त्याअगोरदच राहुलची प्राणज्योत मावळली आहे.
दरम्यान, राहुलच्या अशा अचानक जाण्याने त्याचा चाहत्यांना मोठा धक्काच बसलाय. राहुल आपल्यामध्ये नाहीये हा विश्वास अनेकांना बसत नाहीये.राहुलने अवघ्या १० वर्षांमध्ये बालकलाकार म्हणून स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली. राहुलने अनेक चित्रपटांमध्ये काम केले. राहुलच्या अचानक निधनामुळे त्याच्या चाहत्यांमध्ये शोककळा पसरली आहे.