मुंबई : ‘बिग बॉस मराठी’चा पाचवा सिझन नुकताच पार पडला. या सिझनचा सूरज चव्हाण हा विजेता ठरला आहे. या संपूर्ण सीजनमध्ये ग्रामीण बाज असणाऱ्या साध्या भोळ्या सूरज चव्हाण यांने आपली भलीमोठी छाप पाडली. बिग बॉसच्या घरातील सर्व सदस्यांना ‘गुलीगत’ धोका देत बारामतीचे सुपुत्र आणि रीलस्टार सूरज चव्हाणने आपला जलवा दाखवत या सीझनची ट्रॉफी स्वतःच्या नावावर केली. परंतु ही ट्रॉफी हातात आल्यावर त्याला नाचून दिलं नसल्याचं, सूरजने एका मुलाखतीत बोलताना सांगितलं आहे.
सूरजने हा शो जिंकल्यानंतर सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. बिग बॉसच्या इतिहासात पहिल्यांदाच एका रीलस्टारने ‘बिग बॉस मराठीची ट्रॉफी जिंकली आहे, त्यामुळे सूरजने लाखो चाहत्यांची मनं जिंकली आहेत. सूरज सध्या अनेक ठिकाणी मुलाखती देत असून तो त्याच्या गावात फिरत आहे. ब-याच ठिकाणी जाऊन बिग बॉसची ट्रॉफी जिंकल्यानंतरच्या त्याच्या भावना मांडत आहे.
एका मुलाखतीत बोलताना सूरज म्हणाला, “जेव्हा माझ्या हातात ‘बिग बॉस’ची ट्रॉफी आली. तेव्हा माझ्यात प्रचंड जोश होता. त्यावेळी मला डान्स करण्याची खूप इच्छा होती. परंतु, त्यांनी गाणंच लावलं नाही. सूरज पुढे म्हणतो, बिग बॉसच्या मंचावर गाणं न लावल्याने मी नाचलो नसलो तरी भाऊंच्या धक्क्यावर मी नाचलो. म्हणजे मी ‘भाऊचा’ धक्का या गाण्यावर मनसोक्त नाचलो आहे.
दरम्यान, सोशल मीडियाच्या दुनियेत लोकप्रिय झाल्यानंतर सूरजने मराठी चित्रपटातही काम केलं. राजा राणी आणि मुसंडी यामध्ये सूरजने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. सूरजचे इन्स्टाग्रामवर 2 मिलियनहून अधिक फॉलोअर्स आहेत. तसेच एसक्यूआरक्यूझेडक्यू, ललालीलालालाला, गुलीगत, बुक्कीत टेंगूल, झापुक झुपुक असे अनेक डायलॉग त्याचे सोशल मिडीयावर फेमस झाले आहेत. या त्याच्या बोबड्या बोलाने तो संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध झाला. याच त्याच्या कर्तुत्वावर सुरजने ‘बिग बॉस मराठी पाच’ या सीजनमध्ये एन्ट्री केली, आणि तिथेही त्याने अख्खा महाराष्ट्र हसवला.