मुंबई : लाइव्ह शो नंतर कार्यक्रमातून निघत असताना गायक सोनू निगम यांच्यासोबत धक्काबुक्की करण्याची घटना मुंबईतील चेंबुरमध्ये घडली आहे. एका स्थानिक आमदाराच्या मुलाने ही धक्काबुक्की केल्याचा आरोप सोनू निगमने केला आहे. चेंबुरमध्ये एका लाईव्ह शोनंतर बाहेर पडताना सोनू निगमच्या सुरक्षा रक्षकांना मारहाण करत त्याला धक्काबुक्की करण्यात आली.
मिळालेल्या माहिती नुसार, सोमवारी (ता.२०) रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. लाइव्ह कॉन्सर्टमध्ये भाग घेण्यासाठी सोनू निगम चेंबूरमध्ये होता. आमदार प्रकाश फातर्पेकर यांचे चिरंजीव स्वप्नील फातर्पेकर यांचा सोनू निगमच्या अंगरक्षकांशी सेल्फी घेण्यावरून वाद झाला. सोनू निगमसोबत सेल्फी घेण्यासाठी गर्दी झाली होती. त्यावेळी स्वप्नील फातर्पेकर हेही तिथे होते.
या गर्दीत सोनू निगमच्या अंगरक्षसोबत किरकोळ धक्काबुकी झाल्यानंतर स्वप्नील यांनीदेखील एका अंगरक्षकाला धक्का दिला त्यावरून हा वाद झाल्याची माहिती आहे. या घटनेविरोधात पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे.