मुंबई : बॉलीवूडमधील लोकप्रिय गायक व संगीतकार हिमेश रेशमियावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्याचे वडील-संगीत दिग्दर्शक विपिन रेशमिया यांचं निधन झाले आहे. बुधवारी (18 सप्टेंबरला) रात्री साडेआठच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. ते 87 वर्षांचे होते. फॅशन डिझायनर वनिता थापरने पोस्ट करत विपीन रेशमिया यांच्या निधनाची बातमी दिली आहे.
विपिन रेशमिया यांच्या धीरूभाई रुग्णालयात उपचार सुरू होते. वाढतं वय आणि आजारपणाशी ते गेल्या काही काळापासून झुंजत होते. अखेर काल त्यांचं निधन झालं. बॉलीवूडमधून हळहळ व्यक्त होत आहे. आज गुरुवारी 19 सप्टेंबर रोजी जुहू येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
हिमेश रेशमिया वयाच्या 6 व्या वर्षापासून वडिलांचे संगीत ऐकत होता आणि त्यानंतर तो स्वत:च्या शैलीत ते गाणे गायचा. लहानपणापासून हिमेशला वडिलांनी संगीताचे धडे दिले होते. विपिन रेशमिया यांनी द एक्सपोज (2014) आणि तेरा सुरूर (2016) ची निर्मिती केली होती. त्यांनी इन्साफ का सूरज (1990) नावाच्या चित्रपटासाठी देखील संगीत दिले होते, मात्र तो रिलीजच झाला नाही.