पुणे : सुप्रसिद्ध गायक अदनान सामीने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन पाकिस्तानबाबत नुकतीच एक धक्कादायक माहिती शेअर केली आहे. अदनान सामीची ही पोस्ट सध्या चांगलीच चर्चेत आली आहे. याआधी देखील अदनान सामी जुलैमध्ये एक पोस्ट डिलीट केल्यामुळे चर्चेत आला होता.
2016 मध्ये पाकिस्तानची नागरिकता सोडून भारतीय नागरिक झालेला अदनान सामीने आपल्या आधीच्या देशाच्या संस्थानेची (लष्कराची) निंदा केली आहे. त्याने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंट एक पोस्ट शेअर केली आहे. “अनेक लोकांनी मला विचारलं की,पाकिस्तान बद्दल मी का नाराज आहे.
कटू सत्य असं आहे की, पाकिस्तानमधील त्या लोकांबद्दल माझ्या मनात कोणतीच नाराजी नाही. ज्यांनी माझ्यासोबत चांगलं केलं. मी त्यांच्यावर नेहमीच प्रेम करतो जे माझ्यावर प्रेम करतात.” असे त्याने यात म्हटलं आहे.
“पाकिस्तानमध्ये नेहमी सेनेला संस्थान म्हटलं जातं. परंतु मला या संस्थानाची तक्रार आहे. जे लोक मला जवळून ओळखतात त्यांना माहिती असेल की या संस्थानाने माझ्यासोबत काय केलं आहे…ज्यामुळे मी पाकिस्तान सोडलं आहे.” असे तो म्हणाला.
पुढे अदनान सामीने लिहिलंय की, “एक दिवस लवकरच मी ते सत्य जगासमोर आणणार आहे. ते माझ्यासोबत कसे वागले आहेत. हे अनेकांना माहित नाही. सामान्य माणसाला या गोष्टीचा अंदाज नाही.
यामुळे अनेक लोक आश्चर्यचकित होतील! मी याबाबत अनेक वर्षांपासून गप्प आहे, परंतु आता मी वेळ आल्यावर सर्व सांगणार.”