संभाजीराजे हे नेहमी गड-किल्ल्यांच्या संवर्धनावर बोलताना दिसतात. गेल्या अनेक वर्षांपासून ते या लढ्यात सक्रिय आहेत. नुकतेच त्यांनी लोकसभेची निवडणूक लढवणार असल्याचेही जाहीर केले. दरम्यान, आता संभाजीराजे छत्रपती हे चित्रपटात दिसणार आहेत. ते कोणती भूमिका साकारणार आहेत? याविषयी त्यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत जाहीर केले आहे.
संभाजीराजे छत्रपती यांनी‘मुंबई तक’ला दिलेल्या मुलाखतीत राजकीय मुद्यांवर त्यांचं मत मांडल्यानंतर, लवकरच मराठी चित्रपट करणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्या चित्रपटाचे दिग्दर्शन नागराज मंजुळे करणार आहेत. संभाजीराजे त्यांच्या वंशजांपैकी एकाची भूमिका साकारणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
संभाजीराजे छत्रपती यांचा खुलासा
मुलाखतीत खासदार संभाजीराजे छत्रपती म्हणाले की ‘काही दिवसांपूर्वी नागराज मंजुळेंचा फोन आला होता. त्यावेळी त्यांनी सांगितले की ते खाशाबा जाधव यांच्या जीवनावर आधारीत चित्रपटाची निर्मिती करणार आहेत.’ पुढे बोलताना ते म्हणाले की, ‘खाशाबा जाधव यांना त्यावेळी आमचे आजोबा शहाजी महाराजांनी आर्थिक मदत केली होती. त्यावरून नागराज मंजुळे यांनी मला विचारले की तुम्ही ती भूमिका साकारू शकाल का? शहाजी महाराज आणि माझी चेहरेपट्टी, आवाज, माझे नाक यात त्यांना बरेच साम्य जाणवले. त्यामुळे ही भूमिका मी करावी असा त्यांचा आग्रह होता. तर मी आमचे आजोबा शहाजी महाराजांची भूमिका करण्याचे स्वीकारले आहे.’
खाशाबा जाधव यांच्याविषयी
खाशाबा जाधव हे कुस्तीपटू होते. ऑलिंपिकमध्ये पदक मिळवणारे ते पहिले कुस्तीपटू होते. खाशाबा यांनी 1952 मध्ये हेलसिंकी येथे झालेल्या ऑलिंपिकच्या स्पर्धेतत भारताला कुस्तीमध्ये पहिले पदक मिळवून दिले होते. कुस्तीत इतकी मोठी कामगिरी केल्यानंतर त्यांचे नाव हे भारतीय इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिले गेले. आता त्यांच्याच आयुष्यावर आधारीत चित्रपट येणार आहे. तर या चित्रपटाची निर्मिती ही लोकप्रिय दिग्दर्शक नागराज मंजुळे करणार आहे.