मुंबई : सलमान खानच्या घरावर झालेल्या गोळीबारप्रकरणी मोठी बातमी समोर आली आहे. सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर झालेल्या गोळीबार प्रकरणातील एका आरोपीने आत्महत्या केली आहे. पोलिसांनी सांगितले की, सलमान खानच्या घरावर झालेल्या गोळीबार प्रकरणातील एका आरोपीने पोलीस कोठडीत आत्महत्येचा प्रयत्न केला. अनुज थापन असे आत्महत्या केलेल्या आरोपीचे नाव असून त्याच्यावर शूटर्सना शस्त्रे पुरविल्याचा आरोप होता.
मुंबई पोलीस सूत्राने सांगितले की, आरोपी अनुज थापनने चादर घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. याआधी मुंबईच्या विशेष न्यायालयाने सोमवारी अभिनेता सलमान खानच्या वांद्रे येथील घराबाहेर झालेल्या गोळीबारप्रकरणी अटक केलेल्या तीन आरोपींना ८ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती.
महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (MCOCA) विशेष न्यायाधीश ए.एम. पाटील यांनी आरोपी विकी गुप्ता (24), सागर पाल (21) आणि अनुज थापन (32) यांना पोलीस कोठडी तर सोनू कुमार चंदर बिश्नोई (37) यांना वैद्यकीय आधारावर न्यायालयीन कोठडत पाठवले होते.
पोलिसांनी शनिवारी कथित शूटर गुप्ता आणि पाल तसेच बिश्नोई आणि थापन यांच्याविरुद्ध मोक्का कायद्याच्या तरतुदींनुसार गुन्हा दाखल केला होता. बिश्नोई आणि थापन यांच्यावर दोन बंदुक आणि काडतुसे पुरवल्याचा आरोप आहे. पोलिसांनी गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई आणि त्याचा भाऊ अनमोल यांना वॉन्टेड आरोपी म्हणून जाहीर केले आहे.
आरोपीविरुद्ध भारतीय दंड संहिता आणि शस्त्रास्त्र कायद्याच्या संबंधित तरतुदींनुसार यापूर्वीच गुन्हा दाखल करण्यात आला होता. न्यायालयाने गुप्ता, पाल आणि थापन यांना ८ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली असून बिष्णोई यांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. .
14 एप्रिल रोजी सकाळी वांद्रे येथील सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये मोटरसायकलवरून आलेल्या दोघांनी गोळीबार केल्यानंतर पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम 307 (हत्येचा प्रयत्न) अंतर्गत एफआयआर नोंदवला होता. गुप्ता आणि पाल हे दोघे बिहारचे रहिवासी आहेत, त्यांना 16 एप्रिल रोजी गुजरातमधील कच्छमधून पकडण्यात आले होते, तर सोनू बिश्नोई आणि थापन यांना 25 एप्रिल रोजी पंजाबमधून पकडण्यात आले होते. कॅनडामध्ये राहणाऱ्या अनमोल बिश्नोईने फेसबुक पोस्टद्वारे गोळीबार प्रकरणाची जबाबदारी स्वीकारली होती. मात्र, पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार त्याचा आयपी ॲड्रेस पोर्तुगालचा असल्याचे निष्पन्न झाले आहे. गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई सध्या गुजरातमधील साबरमती तुरुंगात आहे.