मुंबई: बॉलीवूड सुपरस्टार सलमान खानचे घर असलेल्या गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर 14 एप्रिल रोजी झालेल्या गोळीबाराच्या घटनेने सर्वांनाच थक्क केले होते. दरम्यान, वांद्रे येथील बॉलीवूड अभिनेत्याच्या निवासस्थानाबाहेर गोळीबार केल्याप्रकरणी अटक केलेल्या दोघांच्या पोलिस कोठडीत गुरुवारी मुंबई न्यायालयाने २९ एप्रिलपर्यंत वाढ केली. आता या प्रकरणात पोलिसांना आणखी एक मोठे यश मिळाले आहे. गोळीबारप्रकरणी मुंबई पोलिसांनी गुरुवारी पंजाबमधून दोघांना अटक केली. तसेच या प्रकरणी मोठा खुलासा झाला आहे.
पंजाबमधून दोघांना अटक
अभिनेता सलमान खानच्या मुंबईतील घराबाहेर नुकत्याच झालेल्या गोळीबारप्रकरणी मुंबई पोलिसांनी गुरुवारी पंजाबमधून दोघांना अटक केली. एका अधिकाऱ्याने सांगितले की, सुभाष चंदर (37) आणि अनुज थापन (32) यांनी 15 मार्च रोजी नेमबाजांना शस्त्रे आणि काडतुसे दिली होती. दोघांनाही गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली असून त्यांना मुंबईला नेण्यात येत असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.
दोन्ही आरोपींची कोठडी वाढवली
यापूर्वी सलमान खानच्या वांद्रे येथील घराबाहेर झालेल्या गोळीबाराच्या घटनेप्रकरणी पोलिसांनी विकी गुप्ता (24 वर्षे) आणि सागर पाल (21 वर्षे) यांना अटक केली होती. दोघेही बिहारचे रहिवासी आहेत. या दोन्ही आरोपींची पूर्वीची कोठडी संपल्यानंतर आज त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने दोघांनाही आता 29 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
अनमोल बिश्नोई हा वॉण्टेड आरोपी
गुप्ता आणि पाल यांनी 14 एप्रिल रोजी सकाळी वांद्रे येथील गॅलेक्सी अपार्टमेंटमधील 58 वर्षीय सलमान खानच्या घराबाहेर मोटारसायकलवरून पळून जाण्यापूर्वी गोळीबार केला. आरोपींना 16 एप्रिल रोजी गुजरातमधील कच्छ जिल्ह्यातून पकडण्यात आले होते. गुन्हे शाखेच्या पथकाने नंतर गोळीबारात वापरलेली शस्त्रे जप्त करण्यासाठी शोध मोहिमेदरम्यान गुजरातमधील तापी नदीतून दोन पिस्तूल, मॅगझिन आणि गोळ्या जप्त केल्या. मुंबई पोलिसांनी तुरुंगात असलेला गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई आणि त्याचा लहान भाऊ अनमोल बिश्नोई यांना या प्रकरणात वॉन्टेड आरोपी म्हणून घोषित केले आहे.