मुंबई: साजिद नाडियादवाला यांनी काही काळापूर्वी त्यांच्या पुढील प्रोजेक्टची घोषणा केली होती. ‘सनकी’ असे या प्रोजेक्टचे नाव आहे. या चित्रपटात अहान शेट्टी आणि पूजा हेगडे मुख्य भूमिकेत असल्याची बातमी होती. आता या चित्रपटाशी संबंधित एक अपडेट समोर आले आहे. साजिद नाडियादवाला हा सिनेमा बनवण्यापूर्वी पुन्हा एकदा याचा विचार करत असल्याचं बोललं जात आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण, जाणून घेऊया.
साजिद त्याचा जुना मित्र सुनील शेट्टीचा मुलगा अहान याला दुसरी संधी देणार असल्याची बातमी होती. अहानने २०२१ मध्ये ‘तडप’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. मात्र, त्याचा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारसा कमाल दाखवू शकला नाही.
यामुळे चित्रपट बंद होणार का?
‘बॉलीवूड हंगामा’च्या रिपोर्टनुसार, साजिद नाडियादवाला हा चित्रपट बनवण्यापूर्वी पुन्हा एकदा याचा विचार करत आहेत. अहवालानुसार, सॅटेलाइट आणि डिजिटलच्या बाबतीत सध्याची बाजारपेठ पूर्वीच्या स्तरावर नाही. याशिवाय आणखी एक कारण सांगितले जात आहे. हे कारण चित्रपटाचा मुख्य अभिनेता अहान शेट्टीशी संबंधित आहे. अहानचा स्टाफ खर्च हेही एक प्रमुख कारण म्हणून समोर येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, त्याच्या हेअर, मेकअप, स्पॉट, स्टायलिस्ट, ड्रायव्हर, शेफ, ट्रेनर यांचा खर्च खूप जास्त आहे. व्यवसायाच्या दृष्टिकोनातून हा चित्रपट बनवण्यात साजिदला काही फायदा दिसत नाही. त्यामुळे आता तो हा चित्रपट न करण्याचा विचार करत आहे. या चित्रपटाला आता स्थगिती देण्यात आल्याचे बोलले जात आहे. सुनील शेट्टीसोबतच्या मैत्रीमुळे तो हा चित्रपट बनवण्याची शक्यता आहे. असे झाल्यास चित्रपटाचे बजेट कमी होईल आणि अहानला सुपरस्टार ट्रीटमेंट मिळणार नाही.