पुणे : अभिनेता शाहरुख खान आणि दीपिका पदुकोण स्टार ‘पठाण’ या चित्रपटामुळे नवीन वाद निर्माण झाला आहे.अयोध्येतील संत समाजाकडून विरोध होत आहे. ज्या चित्रपटगृहांमध्ये ‘पठाण’ हा चित्रपट प्रदर्शित होईल, ते जाळून टाका, असे वादग्रस्त विधान हनुमानगढीचे महंत राजुदास यांनी केले आहे.
या चित्रपटातील ‘बेशरम रंग…’ या गाण्यात दीपिकाने भगव्या रंगाची बिकिनी परिधान केली आहे. गाण्यात शाहरुख आणि दीपिकाचे बोल्ड सीन्सदेखील आहेत. भगव्या रंगाची बिकिनी परिधान केल्याने वादंग उठले आहे.
महंत राजुदास म्हणाले, ‘बॉलिवूड-हॉलिवूड सतत कोणत्या ना कोणत्या प्रकारे सनातन धर्म आणि संस्कृतीची खिल्ली उडवण्याचा प्रयत्न करत असतात. हिंदू देवतांचा अवमान केला जातो. पठाण चित्रपटात ज्या प्रकारे भगवा, संतांचा रंग, राष्ट्राचा रंग, देशाचा रंग, सनातन संस्कृतीचा रंग यांचा अपमान करण्यात आला आहे, हे खूप दुःखदायक आहे,’ असे ते म्हणाले आहेत.
मी प्रेक्षकांना अशा चित्रपटांवर बहिष्कार घालण्याचे आवाहन करतो. ज्या थिएटरमध्ये हा चित्रपट दाखवला जाईल, ते जाळून टाका. असे न केल्यास ते ताळ्यावर येणार नाहीत. जोपर्यंत तुम्ही दुष्टांशी वाईट वर्तन करत नाही तोपर्यंत तुम्ही त्यांच्यावर नियंत्रण ठेवू शकत नाही,’ असे विधान त्यांनी केले आहे ;असे त्यांनी म्हटलं आहे
आग्रा येथील हिंदू संघटनांनीही या चित्रपटाला विरोध दर्शवला आहे. बोल्ड सीन न हटवल्यास चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही, असा इशारा त्यांनी दिला आहे. महासभेचे सरचिटणीस अवतार सिंग गिल यांनी हे हिंदूंच्या भावना जाणूनबुजून दुखावणारे असल्याचे म्हटले आहे.
सेन्सॉर बोर्डाने परवानगी का दिली असा त्यांचा सवाल आहे. भगवा रंग हा हिंदू धर्माचे प्रतीक आहे. संपूर्ण आग्र्यात हा चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही, असा आक्रमक पवित्रा त्यांनी घेतला आहे.