बॉलीवूड अभिनेत्री रकुल प्रीत सिंग आणि अभिनेता जॅकी भगनानी यांचा विवाहसोहळा गोव्यात थाटामाटात पार पडला. २१ फेब्रुवारीला दक्षिण गोव्यातील आलिशान हॉटेलमध्ये रकुल-जॅकीच्या लग्नाचं आयोजन करण्यात आलं होतं. एएनआयने दिलेल्या माहितीनुसार हे जोडपं पारंपरिक रितीरिवाजानुसार लग्नबंधनात अडकलं आहे.
रकुल प्रीत सिंग-जॅकी भगनानीच्या लग्नात वरुण धवन, राज कुंद्रा, भूमी पेडणेकर, शिल्पा शेट्टी, आयुष्मान खुराना, अर्जुन कपूर, डेव्हिड धवन, आदित्य रॉय कपूर, अनन्या पांडे असे अनेक बॉलीवूड सेलिब्रिटी सहभागी झाले होते. पाहुण्यांच्या तब्येती काळजी घेत त्यांनी शुगर फ्री आणि ग्लूटन फ्री मेन्यू ठेवला आहे.
गोव्यातील ‘आयटीसी ग्रँड गोवा’ या पंचतारांकित हॉटेलमध्ये त्यांचा लग्नसोहळा पार पडला आहे. या लग्नसोहळ्याला रकुल-जॅकीचे कुटुंबीय, मित्रपरिवार आणि बॉलिवूड सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. मीडिया रिपोर्टनुसार, रकुल आणि जॅकी यांनी लग्नात तरुण तहिलयानी, शांतनु आणि निखिल, फाल्गुनी शेन पीकॉक, कुणाल रावल आणि अर्पिता मेहता या पाच डिझायनरने शेअर केलेले कपडे परिधान केले होते.
मिळालेल्या माहितीनुसार, रकुल आणि जॅकी यांचा विवाहसोहळा दोन पद्धतीत पार पडला आहे. पंजाबी व सिंधी अशा दोन पद्धतीत त्यांनी लग्न केलं आहे. रकुल-जॅकीच्या लग्न विधींना १९ फेब्रवारीपासून सुरुवात झाली होती.
रकुल व जॅकी लवकरच मुंबईत एका भव्य रिसेप्शन पार्टीचं आयोजन करणार आहेत. अजून अभिनेत्रीचे लग्नाचे फोटो व विवाह सोहळ्यातील खास क्षण सोशल मीडियावर आले नाहीत.