मुंबई: मल्याळम चित्रपटसृष्टीबाबत हेमा समितीच्या अहवालात झालेल्या खुलाशांनी सर्वांनाच धक्का बसला आहे. अनेक मोठे अभिनेते आणि चित्रपट निर्माते लैंगिक शोषण आणि कास्टिंग काउचसारख्या आरोपांनी घेरले आहेत. हे प्रकरण सध्या खूप चर्चेत आहे. या अहवालानंतर इंडस्ट्रीचे सत्य समोर आल्यानंतर अनेक कलाकार स्वत: पुढे येऊन असे खुलासे करत आहेत, जे धक्कादायक आहेत. आता दाक्षिणात्य अभिनेत्री राधिका सरतकुमार यांनी काही आश्चर्यकारक दावे केले आहेत.
राधिका सरतकुमार या एक अभिनेत्री आहेत, ज्यांनी तमिळ, तेलुगु, कन्नड आणि मल्याळम तसेच हिंदी चित्रपटांमध्ये काम केले आहे. अलीकडेच त्यांनी सांगितले की, एका चित्रपटाच्या सेटवर एका अभिनेत्रीच्या व्हॅनिटी व्हॅनमध्ये गुप्त कॅमेरे लावण्यात आले होते आणि ती कपडे बदलत असतानाचे व्हिडिओ रेकॉर्ड करण्यात आले होते. या घटनेनंतर त्यांनाही व्हॅनिटीमध्ये जाण्याची भीती वाटू लागली.
एशियानेटला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी सांगितले की, ही घटना केरळमध्ये एका चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान घडली. त्यावेळी त्यांनी सेटवर काही लोकांना हसताना पाहिले आहे. प्रत्येकजण व्हिडिओ पाहत होता. त्यानंतर त्यांनी क्रू मेंबरला विचारले की, ते काय पाहत आहेत. त्या क्रू मेंबरने त्यांना सांगितले की, व्हॅनिटी व्हॅनमध्ये गुप्त कॅमेरे होते, ज्याद्वारे महिलांचे कपडे बदलतानाचे व्हिडिओ रेकॉर्ड केले जातात. राधिका सरतकुमार यांनी असेही म्हटले की, क्रू मेंबरने त्यांना फक्त कलाकाराचे नाव लिहायचे आहे आणि तिचे कपडे बदलतानाचा व्हिडिओ उपलब्ध होईल असे सांगितले होते.
राधिका यांनी सांगितले की, त्यांनीही हा व्हिडिओ पाहिला होता. मात्र, ही घटना कधी आणि कोणत्या चित्रपटाच्या सेटवर घडली? याबाबत काहीही सांगण्यास त्यांनी नकार दिला. त्या म्हणाल्या की, जेव्हा त्यांना गुप्त कॅमेऱ्यांची माहिती मिळाली, तेव्हा त्यांचा व्हॅनिटी टीमसोबत वाद झाला. यामुळे त्या खूप संतापल्या आणि टीमला सांगितले की, त्यांना सुरक्षित राहायचे आहे. जर त्यांच्या व्हॅनमध्ये कॅमेरा दिसला, तर व्हॅनिटी टीमला चप्पलने मारेल.
राधिका यांनी पुढे म्हटले की, व्हॅनिटी ही व्यक्तीची खाजगी जागा आहे, जिथे कलाकार आराम करतात, जेवण खातात, कपडे बदलतात. पण या घटनेनंतर त्यांना व्हॅनमध्ये जायची भीती वाटू लागली. त्यानंतर त्या हॉटेलच्या खोलीत जाऊन कपडे बदलू लागल्या. व्हॅनिटी व्हॅनमध्ये गुप्त कॅमेरे असल्याची माहिती आपल्यासोबत काम करणाऱ्या कलाकारांना दिल्याचेही त्यांनी सांगितले. मात्र, हेमा समितीच्या अहवालात मल्याळम फिल्म इंडस्ट्रीमध्ये महिला कलाकारांवर कोणत्या स्तरावर लैंगिक छळ होत असल्याचे समोर आले आहे. हा अहवाल १९ ऑगस्ट रोजी समोर आला. यावर राधिका म्हणाल्या की, हेमा समितीचा अहवाल येण्यास इतका वेळ का लागला?
राधिका या जवळपास ४६ वर्षांपासून फिल्म इंडस्ट्रीत काम करत आहे. 1978 साली ‘किजहाके पोगम रेल’ नावाचा तेलगू रोमँटिक ड्रामा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटातून त्यांनी आपल्या करिअरची सुरुवात केली. 1986 मध्ये रिलीज झालेल्या ऋषी कपूर यांच्या ‘नसीब अपना अपना’ या चित्रपटातही त्यांनी काम केले आहे.