पुणे : छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित बहुप्रतीक्षित ‘छावा’ चित्रपटाचा ट्रेलर २२ डिसेंबर रोजी प्रदर्शित झाला. ‘छावा’ या चित्रपटाचे दिग्दर्शन लक्ष्मण उत्तेकर यांनी केले आहे. या चित्रपटात विकी कौशल आणि रश्मिका हे मुख्य भूमिकेत आहेत. मात्र चित्रपटातील ट्रेलरमधील काही प्रसंगावरून पुण्यातील शिवप्रेमींकडून नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. मराठा क्रांती मोर्चातर्फे आज पुण्यात आंदोलन करण्याचा इशारा देखील देण्यात आला आहे.

‘छावा’ या चित्रपटात अभिनेता विकी कौशल छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारत असून रश्मिका मंदाना महाराणी येसूबाईंच्या भूमिकेत आहे. एकीकडे या चित्रपटाच्या ट्रेलरचे भरभरून कौतुक होत असताना पुण्यात मात्र या चित्रपटातील छत्रपती संभाजी महाराज व येसूबाई यांच्या बद्दल आक्षेपार्ह प्रसंग दाखवण्यात आला असल्याचा आरोप मराठा क्रांती मोर्चाकडून करण्यात आला आहे.
नेमकं प्रकरण काय?
‘छावा’ या चित्रपटात दाखवण्यात आलेले छत्रपती संभाजी महाराज व येसूबाई यांचे नाचतानाचे दोन प्रसंग या चित्रपटात दाखवले आहेत. हे प्रसंग आक्षेपार्ह असल्यामुळे चित्रपटाच्या निर्मात्यांनी त्वरित हे दोन्ही प्रसंग चित्रपटातून वगळावे असे मराठा मोर्चेच्यावतीने आवाहन करण्यात आले आहे. यासाठी आज सकाळी १० वाजता लाल महाल येथे चित्रपटाचा निषेध केला जाणार आहे.

विकी कौशल, रश्मिका मंदान्ना आणि अक्षय खन्ना यांचा ‘छावा’ हा चित्रपट पुढील महिन्यात व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने म्हणजेच १४ फेब्रुवारी २०२५ रोजी प्रदर्शित होणार आहे.








