मुंबई: २ फेब्रुवारीला अभिनेत्री आणि मॉडेल पूनम पांडेच्या निधनाच्या बातमीने संपूर्ण मनोरंजन इंडस्ट्रीला धक्का बसला. पूनमच्या मॅनेजरने एका इंस्टाग्राम पोस्टमध्ये अभिनेत्रीचा मृत्यू झाल्याची घोषणा केली होती. गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगामुळे तिचा मृत्यू झाला आहे, असा उल्लेख त्यामध्ये होता. पण जसजस दिवस सरत गेला, तसतशी पूनमच्या मृत्यूची बातमी एक गूढ बनत गेली. संध्याकाळी बातमी आली की पूनम, तिची मॅनेजर आणि संपूर्ण कुटुंबाचे फोन बंद आहेत. एकाच वेळी सर्वांचे फोन बंद असल्याने आणि अभिनेत्रीचा मृतदेह न सापडल्याने या संपूर्ण प्रकरणावर सस्पेन्स निर्माण झाला होता.
इंडस्ट्री संतप्त:
3 फेब्रुवारीच्या सकाळी पूनमने एक व्हिडिओ शेअर केला, ज्यामध्ये तिने सांगितले की, मृत्यू झाल्याची खोटी बातमी ही हे गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी पसरवली होती. 2 फेब्रुवारी रोजी फिल्म इंडस्ट्री आणि टीव्ही सेलिब्रिटी पूनमला श्रद्धांजली वाहत असताना, अभिनेत्रीचा नवीन व्हिडिओ पाहून ते संतप्त झाले. सर्वांनी पूनमला फटकारले आणि तिच्यावर टीका केली. पूनमने पब्लिसिटी स्टंट आणि पीआरमुळे मरण्याचे नाटक करणे योग्य नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. आयुष्य खूप मौल्यवान आहे आणि यात मृत्यूचे नाटक आहे, एक लज्जास्पद कृत्य आहे, असं देखील कलाकारांनी म्हटले.
पूनमविरोधात पोलिसात तक्रार दाखल :
अभिनेत्री पूनम पांडेविरोधात वकील अली काशिफ खान देशमुख यांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे. एवढेच नाही तर अभिनेत्रीची मॅनेजर निकिता शर्मा आणि एजन्सी हॉटरफ्लाय यांच्याविरुद्ध आयपीसी कलम ४१७, ४२०, १२०बी, ३४ अंतर्गत एफआयआर दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. गर्भाशयाच्या कर्करोगाच्या नावाखाली जनतेची फसवणूक आणि देशाची फसवणूक केल्याचा आरोप सर्वांनी केला आहे. पूनमचा हा स्टंट प्रसिद्धी आणि फसवणूक असल्याचे जाहीर करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.