नाशिक: इन्स्टाग्रामच्या माध्यमातून माझी ६१ लाखांची फसवणूक झाल्याचे वृत्त समाजमाध्यमात माझ्या फोटोसहित प्रसिद्ध करण्यात आले. प्रत्यक्षात माझी कुठलीही फसवणूक झाली नाही. हे वृत्त पूर्णपणे चुकीचे असून, त्यात तथ्य नाही. सागर कारंडे नावाच्या अनेक व्यक्ती आहेत. फसवणूक झालेला ‘तो’ सागर कारंडे मी नाही, असे हास्य अभिनेता सागर कारंडे याने स्पष्ट केले. याप्रकरणी संबंधितांवर अब्रूनुकसानीचा दावा ठोकणार असल्याचेही कारंडे याने सांगितले.
इन्स्टाग्रामवरील पोस्टला लाइक करून दीडशे रुपये मिळवा, या प्रलोभनाला बळी पडून प्रसिद्ध हास्यकलाकार, लेखक व अभिनेता सागर कारंडेची सायबर भामट्यांनी तब्बल ६१.८३ लाख रुपयांची फसवणूक केल्याचे वृत्त समाजमाध्यमांत शुक्रवारी झळकले. पिंपळगाव बसवंत दौऱ्यावर असलेल्या सागर कारंडेशी याबाबत संवाद साधला असता, हे वृत्त बनावट असल्याचे सांगितले. असे काही झालेले नाही. ६१ लाख रुपये माझ्याकडे का असतील? ही खूप मोठी रक्कम आहे. त्यात मी एखाद्या नाटकाची निर्मिती केली असती. मुंबईत गेल्यानंतर, हे वृत्त कसे प्रसिद्ध झाले, याचा पोलीस स्टेशनला जाऊन तपास करणार आहे. शिवाय संबंधितांवर अब्रूनुकसानीचा दावा दाखल करणार आहे, असेही सागर कारंडेने स्पष्ट केले
अलर्ट राहा…
सध्या वाढत्या फसवणूक प्रकाराबाबत जनतेने नेहमी अलर्ट राहावे. यूपीआयसह कुठल्याही लिंकवर क्लिक करू नका. जेणेकरून फसवणूक टाळण्यास मदत होईल, असे आवाहन कारंडे यांनी यावेळी केले.