Nikita Gandhi : केरळ : प्रसिद्ध गायिका निकिता गांधी हिच्या कोची येथील कॉन्सर्टमध्ये चेंगराचेंगरीची अत्यंत दुर्दैवी घटना घडली. कोची युनिव्हर्सिटी ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी कॉलेजमध्ये चेंगराचेंगरीच्या घटनेत ४ विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला असून जवळपास ६४ जण जखमी झाले आहेत. या दुर्दैवी घटनेनंतर गायिकेने सोशल मीडियाद्वारे शोक व्यक्त केला आहे.
निकिता गांधींकडून शोक व्यक्त
या दुर्दैवी घटनेनंतर निकिता गांधीने शोक व्यक्त केला आहे. ती म्हणाली, “२५ नोव्हेंबर रोजी संध्याकाळी कोचीमध्ये जी घटना घडली, त्या घटनेमुळे हृदय पिळवटून निघाले आणि अतिव दुःख झाले. मी या कॉन्सर्टसाठी रवाना होण्यापूर्वीच ही दुर्दैवी घटना घडली. या दुःखद घटनेवर शोक व्यक्त करण्यासाठी माझ्याकडे पुरेसे शब्द नाहीत. विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांसाठी मी प्रार्थना करते.”
केरळच्या कोची युनिव्हर्सिटी ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजीमध्ये शनिवारी (२५ नोव्हेंबर) ओपन एअर टेक फेस्टिव्हलचं आयोजन करण्यात आलं होतं. या फेस्टिव्हलमध्ये गायिका निकिता गांधीचा कॉन्सर्ट आयोजित केला होता. या कॉन्सर्टसाठी विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. काही कळण्याच्या आल कॉन्सर्टमध्ये अचानक चेंगराचेंगरी झाली. त्यात ४ विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आणि ६४ जण जखमी झाले. अतुल थंबी, अॅन रुफ्था, सारा थॉमस आणि अल्विन जोसेफ अशी मृत विद्यार्थ्यांची नाव आहेत.
माहितीनुसार, कोची युनिव्हर्सिटीमधील कॉन्सर्टमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीचं कारण पाऊस होता. पाऊस सुरू होताच विद्यार्थ्यांची धावपळ सुरू झाली आणि ही दुर्दैवी घटना घडली. सुरुवातीला ही घटना निकिता गांधीच्या कॉन्सर्ट सुरू असताना झाल्याचं सांगण्यात आलं होतं. पण ही घटना तिचा कॉन्सर्ट सुरू होण्याआधीच घडली, अशी अधिकाऱ्यांनी माहिती दिली.