कोल्हापूर : कुस्ती या क्रीडा प्रकारात ऑलिम्पिकमध्ये भारताला पहिलं पदक मिळवून देणारे पैलवान खाशाबा जाधव या लोकप्रिय व्यक्तीमत्वाच्या आयुष्यावर आधारीत बायोपिक येत आहे. खाशाबांवर बायोपिक करण्याची घोषणा प्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी केली आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील उमळवाडमध्ये महाशिवरात्री यात्रे निमित्तानं भरवलेल्या भव्य कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. याच कुस्तीच्या मैदानातून नागराज मंजुळे यांनी खाशाबा जाधव यांच्या आयुष्यावर आधारित सिनेमा बनवण्याची घोषणा केली.
यावेळी कोल्हापूर विभागीय धर्मादाय सहउपआयुक्त शशिकांत हेर्लेकर, विशेष कायर्कारी अधिकारी मुख्यमंत्री कार्यालय मंगेश चिवटे, माजी मंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर, हिंदकेसरी दिनानाथ सिंग, संतोष वेताळ, पुणे जिल्हा कुस्तीगार संघटनेचे संघटक युवराज काकडे, राष्ट्रीय खेळाडू गोविंद पवार, महाराष्ट्र चाम्पियान विनोद देसाई, संभाजी सावर्डेकर, नितीन पाटील, पैलवान शहाजी पवार, कुस्तीपटू व कुस्तीशौकीन आदी मान्यवर मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या.
जागतिक दर्जाच्या पैलवानाच्या आयुष्यावर आधारीत बायोपिकची घोषणा नागराज मंजुळे यांनी केली आहे. खाशाबा जाधव यांनी हेलसिंकी इथं १९५२ मध्ये झालेल्या ऑलिम्पिकमध्ये भारताला कुस्ती या व्यक्तीगत क्रीडा प्रकारामध्ये पहिलं पदक मिळवून दिलं होतं. या स्पर्धेत खाशाबा जाधव यांनी कांस्य पदक जिंकलं होतं. देशासाठी पहिलं आंतरराष्ट्रीय पदक मिळवणारा लाल मातीतला अस्सल मराठमोळा माणूस म्हणजेच, खाशाबा जाधव. खाशाबांचं आयुष्य रुपेरी पडद्याच्या माध्यमातून जगासमोर यावं या उद्देशानं हा सिनेमा करत असल्याचं नागराज मंजुळे यांनी सांगितलं.
यापुढे बोलताना नागराज मंजुळे म्हणाले, “खाशाबा जाधव हे जागतिक किर्तीचे आणि दर्जाचे पैलवान होते. त्यामुळे त्यांच्यासाठी काहीतरी करण्याची इच्छा होती. त्यामुळे त्यांच्या आयुष्यावर सिनेमा बनवण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. माझ्यासाठी ही खूप आनंदाची गोष्ट आहे. लवकरच मी यासंदर्भात माहिती देईल. या सिनेमाचं शूटिंगदेखील कोल्हापुरात होऊ शकतं. या सिनेमाच्या माध्यमातून प्रेक्षकांना तो काळ अनुभवायला मिळणार आहे”.