मुंबई : रणमर्दिनी, रणरागिनी महाराणी ताराबाई राजाराम भोसले यांच्यावर आधारीत “मोगलमर्दिनी छत्रपती ताराराणी” चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख अखेर ठरली आहे. २२ मार्च २०२४ पासून संपूर्ण महाराष्ट्रातील चित्रपटगृहात दाखल होण्यासाठी चित्रपट सज्ज झाला आहे. स्वराज्याच्या तिन्ही छत्रपतींचे छत्र हरवल्यानंतर पोरक्या झालेल्या मराठा साम्राज्याला आधार देणाऱ्या तसेच आपल्या तलवारीच्या पातीवर दिल्लीच्या पातशहालाही नमवणारी रणमर्दिनी, रणरागिनी महाराणी ताराबाई राजाराम भोसले म्हणजे स्त्रीनेतृत्वाचे सर्वोत्कृष्ट उदाहरण.
दिग्दर्शक राहुल जनार्दन जाधव डॉ. जयसिंगराव पवार यांच्या ‘मोगलमर्दिनी महाराणी ताराराणी’ या ग्रंथावर आधारित ‘मोगलमर्दिनी छत्रपती ताराराणी’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस घेऊन येत आहेत. अयोध्या राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे औचित्य साधत या बहुप्रतीक्षित ऐतिहासिक चित्रपटाच्या नवीन पोस्टरचे अनावरण करण्यात आले.
सोनाली कुलकर्णी मोगलमर्दिनी छत्रपती ताराराणी यांच्या मुख्य भूमिकेत दिसणार आहे. गेले अनेक दिवस प्रेक्षक या सिनेमाची वाट पाहत होते. आता ही प्रतिक्षा संपली असून येत्या २२ मार्चला हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. गोल्डन रेशियो फिल्म्स, किंग्जमेन प्रॉडक्शन प्रस्तुत, अक्षय विलास बर्दापूरकर, प्लॅनेट मराठी आणि मंत्रा व्हिजन यांच्या सहयोगाने डॉ. जयसिंगराव पवार लिखित ‘मोगलमर्दिनी छत्रपती ताराराणी’ या ग्रंथावर आधारित या चित्रपटाची कथा, पटकथा आणि संवाद डॉ. सुधीर निकम यांचे आहेत. अक्षय बर्दापूरकर, दीपा त्रासी निर्मित या चित्रपटाचे क्रिएटिव्ह वाईब, सौम्या मोहंती विळेकर, समीर अरोरा सहनिर्माते आहेत.