सध्या जिकडे तिकडे तामिळ चित्रपटांचा बोलबाला आहे. त्यातच आता अभिनेत्री मिथिला पालकर बॉलिवूडनंतर तामिळ चित्रपटांमध्ये झळकणार आहे. ‘ओहो एन्थान बेबी’ या तामिळ चित्रपटातून मिथिला तामिळ सिनेसृष्टीत प्रवेश करणार आहे. नुकतेच या चित्रपटाची घोषणा करण्यात आली. यावेळी मिथिला चित्रपटाच्या टीम सोबत उपस्थित होती.
मिथिलाचा नवा चित्रपट‘ओहो एन्थान बेबी’चे दिग्दर्शन कृष्णकुमार रामकुमार करत आहेत. रोमियो पिक्चर्स, विष्णू विशाल आणि डी कंपनी या चित्रपटाची निर्मिती करत आहेत. चित्रपटाला संगीत दरबुका सिवा यांनी दिले आहे.
तामिळ चित्रपटातील पदार्पणाबद्दल बोलताना मिथिलाने आपल्या भावना व्यक्त केल्यात. ती म्हणाली, “मला साउथमध्ये काम करायला खूप आवडते, तेलुगू सिनेमातील माझा अनुभव अप्रतिम आहे. तामिळ चित्रपटात काम करत असताना आनंद, उत्साह असून दुसरीकडे काहीसे दडपण वाटत आहे. मी आता या चित्रपटाबद्दल फार काही सांगू शकत नाही, पण प्रेक्षकांना फार काळ प्रतीक्षा करायला लागणार नाही असेही मिथिला पालकरने म्हटले.
पालकरने 2015 मध्ये मराठी भाषेतील माझे हनीमून या लघुपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. निखिल आडवाणी यांचा कट्टीबट्टी हा मिथिलाचा पहिला चित्रपट होता. 2017 मधील मुरांबा या मराठी चित्रपटात तिने काम केले. त्याशिवाय, 2018 मध्ये आलेल्या कारवाँ या चित्रपटातील तिच्या कामाचे कौतुक झाले आहे. मिथिलाला तिच्या अभिनयासाठी विविध पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे. मिथिला पालकरने ‘गर्ल इन द सिटी’ आणि नेटफ्लिक्सच्या ‘लिटिल थिंग्ज’या सीरिजमध्ये काम केले आहे.