Miss Universe 2023 : नवी दिल्ली : मिस युनिव्हर्स 2023 स्पर्धेत एकूण ८४ देशातील स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. तर उपांत्य फेरीत २० स्पर्धकांची निवड करण्यात आली होती. या स्पर्धेत निकारागुआची शेनिस पॅलासिओस हीने मिस युनिव्हर्सचा क्राउन जिंकला. या २० स्पर्धकांमध्ये भारताची मॉडेल श्वेता शारदा हिचाही समावेश होता.
७२ वी मिस युनिव्हर्स
निकारागुआची शेनिस पॅलासिओस ही ७२ वी मिस युनिव्हर्स ठरली आहे. एल साल्वाडोरची राजधानी सॅन साल्वाडोर येथील जोस अडोल्फो पिनेड एरिना येथे ही स्पर्धा पार पडली. मिस युनिव्हर्स २०२२ ची मानकरी आर बोनी गाब्रिअलने शेनिस पॅलासिओसला मिस युनव्हर्सचा मुकूट घातला.
श्वेता शारदा ही चंदिगडची रहिवासी आहे. तिचे शिक्षण मॉडर्न कॉम्प्लेक्स मणिमाजरा येथील शासकीय मॉडेल स्कूलमधून झाले आहे. ती उपांत्य फेरीत पोहोचल्याने भारतीयांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. तिच्या जिंकण्यासाठी प्रार्थना केली जात होती. परंतु, अंतिम फेरीतील टॉप १० मध्ये तिची निवड झाली नाही. तर, अंतिम फेरीत निकारागुआच्या शेनिस पॅलासिओस हिने बाजी मारली.
या प्रश्नामुळे जिंकला मुकुट
कोणत्या एका महिलेचे आयुष्य एक वर्ष जगायला आवडेल असा प्रश्न अंतिम सामन्यात विचारण्यात आला होता. यावेळी शेनिसच्या उत्तराने परिक्षकांचं मन जिंकलं, त्यामुळे तिला मिस युनिव्हर्सचा खिताब दिला आहे. महिला हक्क कार्यकर्त्या आणि स्त्रीवादाची जननी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मेरी वोलस्टोनक्राफ्टचं आयुष्य एक वर्ष जगायला आवडेल, असं शेनिस म्हणाली.
मिस युनिव्हर्स खिताब मिळवणारी निकारगुआतील पहिली महिला आहे. मिस युनिव्हर्स म्हणून तिच्या नावाचा उल्लेख होताच ती प्रचंड खूश झाली. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या फोटोंमध्ये ती भावूक झालेली दिसत आहे. या स्पर्धेत ऑस्ट्रेलियाची मोरया विल्सन दुसरी रनर-अप ठरली. तर, थायलंडची एन्टोनिया पोर्सिल्ड पहिली रनर-अप विजेती ठरली.