चेन्नई: मद्रास उच्च न्यायालयाकडून मन्सूर अली खान यांना मोठा दणका बसला आहे. कोर्टाने अभिनेत्याला एक लाख रुपयांचा दंड ठोठावला असून तो यापुढे अभिनेत्री त्रिशा कृष्णनवर मानहानीचा खटला दाखल करू शकणार नाही. मन्सूर अली खान यांनी त्रिशा, चिरंजीवी आणि खुशबू सुंदर यांच्यावर मानहानीचा खटला दाखल करणार असल्याचे सांगितले होते. मात्र, आता शुक्रवारी मद्रास उच्च न्यायालयाने त्यांना यासाठी परवानगी देण्यास नकार दिला आहे. बदनामीचा खटला हा पब्लिसिटी स्टंट वाटत असल्याचे खंडपीठाचे म्हटले आहे.
हिंदुस्तान टाईम्समध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार न्यायालयाने मन्सूरला ठोठावलेला दंड चेन्नईतील अड्यार कॅन्सर इन्स्टिट्यूटमध्ये जमा करावा लागणार आहे. मन्सूरच्या वक्तव्यावर त्रिशा आणि इतर लोकांनी ज्या पद्धतीने प्रतिक्रिया दिल्या, कोणत्याही सामान्य माणसाचीही तशीच प्रतिक्रिया असेल, असेही न्यायालयाने म्हटले आहे. लिओ या चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान मन्सूर यांनी त्रिशाबद्दल अपमानजनक कमेंट केली होती.
त्रिशाने सोशल मीडियावर आपला राग व्यक्त केला होता, ज्यावर चिरंजीवी, खुशबू, त्रिशा आणि लिओच्या निर्मात्यांनी सोशल मीडियावर त्याची निंदा केली होती. त्रिशाने एक्सवर पोस्ट करत लिहिले होते की, ‘अलिकडेच एक व्हिडिओ माझ्या समोर आला आहे, ज्यामध्ये मन्सूर अली खान यांनी माझ्याबद्दल असभ्य आणि चुकीच्या पद्धतीने बोलले आहे. मी याचा तीव्र निषेध करते आणि त्यांना लैंगिकतावादी, अपमानास्पद, महिलाविरोधी आणि घृणास्पद मानते.
त्रिशाने पुढे लिहिले होते, ‘त्याला असे वाटेल पण मी आभारी आहे की, मी त्याच्यासारख्या वाईट व्यक्तीसोबत कधीही स्क्रीन शेअर केली नाही आणि माझ्या उर्वरित चित्रपट कारकिर्दीतही मी हे लक्षात ठेवेन. असे कधीही होऊ नये.
अलीकडेच मन्सूरने त्रिशा, चिरंजीवी आणि खुशबू यांच्याविरुद्ध दिवाणी मानहानीचा खटला दाखल करण्याची परवानगी मागितली होती. त्याने दावा केला होता की त्याच्या विनोदाचा गैरसमज झाला होता आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर त्याच्याबद्दल अपमानास्पद टिप्पण्या केल्या गेल्या होत्या.