Actor Mohan Raj Passes Away : मल्याळम फिल्म इंडस्ट्रीमधील प्रसिद्ध अभिनेते मोहन राज यांचे निधन झाले आहे. वयाच्या 61 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. राहत्या घरात मोहन राज यांचा गुरुवारी मृत्यू झाला. शुक्रवारी (दि. 4 ऑक्टोबर) रोजी केरळमध्ये त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
मल्याळम इंडस्ट्रीमध्ये खलनायक म्हणून प्रसिद्ध असलेले मोहन राज हे गेल्या काही दिवसांपासून गंभीर आजाराशी झुंज देत होते. गुरुवारी अखेर त्यांची प्राणज्योत मालवली. सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे. या दु:खद बातमीनंतर सहकारी कलाकार, चित्रपट निर्माते आणि चाहत्यांकडून शोक व्यक्त करण्यात आला आहे.
मोहन राज यांनी ‘कीरीदम’ या 1989 साली प्रदर्शित झालेल्या चित्रपटातून अभिनयाच्या प्रवासाला सुरुवात केली. त्यांची ही भूमिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीला उतरली होती. मल्याळम, तमिळ आणि तेलुगू चित्रपटांमधील कामासाठी ते ओळखले जात होते. मल्याळम चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध खलनायक म्हणून मोहन राज यांना ओळखलं जायचं. मोहन राज ‘कीरीदम’ व्यतिरिक्त ‘मिमिक्स परेड’ (1991), ‘उप्पुकंदम ब्रदर्स’ (1993), ‘हिटलर’ (1996) आणि ‘मायावी’ (2007) यांसारख्या चित्रपटांमध्ये धमाकेदार परफॉर्मन्स दिला होता.