पुणे : नुकत्याच प्रदर्शित झालेल्या लोकशाही चित्रपटाच्या ट्रेलर आणि गीतांनी महाराष्ट्रातील रसिक प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता निर्माण केली आहे. लोकशाही चित्रपट येत्या 9 फेब्रुवारी रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार असून प्रेक्षकांना चित्रपटगृहात विलक्षण अनुभव घेता येणार आहे.
राजकारणातील महिलांचं अस्तित्व, घराणेशाही, सत्तासंघर्ष, निवडणुकांची रणधुमाळी, राजकीय कुरघोडी, पक्षांचा प्रचार आणि विजयाचा गुलाल चित्रपटात पाहायला मिळणार आहे. ज्येष्ठ अभिनेते मोहन आगाशे आणि महाराष्ट्राची लाडकी अभिनेत्री तेजश्री प्रधान यांच्या भूमिका प्रेक्षकांना खिळवून ठेवणार असून अंकित मोहन, गिरीश ओक, समीर धर्माधिकारी, भार्गवी चिरमुले, अमित रियान, शंतनु मोगे, प्रसन्न केतकर, सुश्रुत मंकणी, अजिता कुलकर्णी, सोनल वाघमारे हे सुप्रसिद्ध कलाकार राजकारणाच्या खेळात धुरळा उडवणार आहेत.
लोकशाही ही एका घराणेशाहीतल्या एका मुलीच्या वैयक्तिक पेचप्रसंगाची कथा आहे, जी तणावग्रस्त राजकीय नाटकाच्या पार्श्वभूमीवर घडलेल्या नैतिक अनैतिक कृत्यांवर आधारित आहे. समाजकारणात रस असलेल्या राजकारणी घराण्यात वाढलेल्या मुलीच्या आयुष्यात अनपेक्षित घटनांची साखळी घडत जाते. जी साखळी तिच्या वडिलांच्या हत्येचं कारण बनते. सत्तेच्या हव्यासापोटी रक्ताच्याच नात्यांनी तिच्या वडिलांचा जीव घेतला आहे, मात्र हत्या आणि हत्यामागचा कट कोणाचा आहे हे चित्रपटात कळणार आहे.