पुणे : साठ वर्षांहून अधिक काळ आपल्या गायनाने रसिकांच्या मनावर अधिराज्य करणाऱ्या महाराष्ट्राच्या लावणीसम्राज्ञी ज्येष्ठ पार्श्वगायिका सुलोचना चव्हाण यांचे आज निधन झाले आहे. वयाच्या ९२ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
मुंबईतील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. याचवर्षी कला क्षेत्रातील अमूल्य योगदानाबद्दल त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
तुझ्या उसाला लागल कोल्हा, पदरावती जरतारिचा, सोळावे वरिस धोक्याचे , कसे काय पाटील बरे हाय का?, हे त्यांच्या प्रसिद्ध लावण्या आहेत.
सुलोचना चव्हाण यांनी हिंदी चित्रपटासाठी अल्बम गाणी रेकॉर्ड केली होती. त्यांच्या प्रसिद्ध हिंदी गाण्यांमध्ये ‘छोरी चोरी आग सी दिल में लगाके’, ‘उल्फत जिसे कहते हैं, जीने का सहारा है’, ‘मौसम आया है रंगें’, ‘वो आए हैं’ समाविष्ट आहेत.
सुलोचना यांचा जन्म १३ मार्च १९३३ (मुंबई) येथे झाला होता. लावणी सम्राज्ञी सुलोचना चव्हाण या माहेरच्या कदम. हे कुटुंब मूळ कोल्हापूरचे, पण सुलोचना चव्हाण यांचे बालपण ठाकूरद्वारच्या फणसवाडी परिसरात चाळसंस्कृतीत गेले. त्यांच्या आईचा व्यवसाय फुलविक्रीचा होता. सुलोचना या बालपणापासून नियमित असे गाणे शिकल्या नाहीत. त्या घरचा रेडिओ आणि ग्रामोफोन यांवरून जे काही कानावर पडेल ते तन्मयतेने ऐकून गात असत. त्यामुळे त्यांचे कोणी गुरू नाहीत; तसेच कोणी शिष्यही नाहीत.
लहानपणापासून त्यांनी गायला सुरुवात केली. सोबतीतच त्यांनी हिंदी, गुजराती आणि उर्दू नाटकात बालभूमिका केलेल्या आहेत. सुलोचना या १९४६-४७ पासून हिंदी चित्रपटात पार्श्वगायन करू लागल्या. ‘श्रीकृष्ण बालमेळ्या’ मधील रंगभूषाकार दांडेकर हे चित्रपटसृष्टीशी संबंधित होते. त्यांच्यामुळे संगीत दिग्दर्शक श्यामबाबू भट्टाचार्य पाठक यांच्याकडे त्यांनी पहिले गाणे गायल्या. त्यावेळी तो चित्रपट हिंदी भाषेतील होता. त्याचे नाव होते ‘कृष्ण सुदामा’. त्यानंतर त्यांनी मास्टर भगवान यांच्या काही चित्रपटांसाठी पार्श्वगायन केले.
सुलोचना चव्हाण यांना मोहम्मद रफी, मन्ना डे, शमशाद बेगम, गीता दत्त यांच्या सारख्या आघाडीच्या गायकांसोबत पार्श्वगायनाची संधी मिळाली. त्यांनी वयाच्या सोळाव्या वर्षी गायक मन्ना डे यांच्या सोबत ‘भोजपुरी रामायण’ मध्ये गीत गायले. सुलोचना या हिंदीतून मराठी चित्रपटात आल्या त्या ‘ही माझी लक्ष्मी’ या चित्रपटाद्वारे. त्याचे संगीतकार होते वसंत देसाई. सुलोचना यांनी त्या चित्रपटासाठी गायलेली लावणी हंसा वाडकर यांच्यावर चित्रित झाली.
सुलोचना यांनी मराठी व्यतिरीक्त हिंदी, गुजराती, भोजपुरी, तामिळ, पंजाबी या भाषा मध्ये भजन, गझल असे विविध प्रकार गायले आहेत. त्यांच्या गझल गायन ऐकून बेगम अख्तर यांनी त्यांना जवळ घेऊन दिलखुलास दाद दिली होती. ही सुलोचना यांच्या आयुष्यातील महत्त्वाची आठवण. सुलोचना यांचे शास्त्रीय गायकीचे शिक्षण झाले नाही हे ऐकून तर बेगम अख्तर यांना मोठे आश्चर्य वाटले होते.
सुलोचना चव्हाण यांच्या गायन कारकिर्दीला १९५५ मध्ये अनपेक्षित वळण मिळाले. निर्माता व दिग्दर्शक शामराव चव्हाण यांनी ‘कलगीतुरा’ या तमाशापटाची निर्मिती केली. कथा पटकथा, संवाद प्रबोधनकार ठाकरे यांचे होते तर संगीत दत्ता कोरगावकर यांचे. सुलोचना यांनी पार्श्वगायन केलेला तो दुसरा मराठी चित्रपट. यातील त्यांचा ग्रामीण ढंगातील गावरान बाज जनतेला भावला आणि सुलोचना यांची लावणी गायिका म्हणून ओळख निर्माण झाली.
सुलोचना चव्हाण यांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत. शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठानचा २००९ सालचा राम कदम कलागौरव पुरस्कार, महाराष्ट्र सरकारचा ’मल्हारी मार्तंड’ या चित्रपटाच्या पार्श्वगायनाकरिता १९६५ सालचा पुरस्कार, संगीत क्षेत्रातील विशेष कामगिरीसाठी दिला जाणारा महाराष्ट्र शासनाचा वर्ष २०१० चा ‘लता मंगेशकर’ पुरस्कार.
आपले पती वसंतराव गेल्याचा फार मोठा धक्का सुलोचना चव्हाण यांना बसला होता. त्या काही काळ मुक्या झाल्या होत्या. त्यांनी गाणी गायली नाहीत, पण नंतर सुलोचना चव्हाण यांच्या ‘पाडाला पिकलाय आंबा’, ‘कळीदार कपुरी पानं’ या सारख्या काही लावण्या गाजल्या. त्यांच्या जाण्याने आज पुन्हा एक वर्तुळ पूर्ण झाले.