पुणे : टिकटॉक स्टार आणि लावणी नृत्यांगना गौतमी पाटील गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. एकीकडे प्रेक्षक तिच्या डान्सचे कौतुक करत आहेत तर तिच्या डान्सवर महाराष्ट्रातून टीका केली जात असून अश्लील नृत्यावर बंदी घालावी, अशी मागणी देखील होत आहे. असे असले तरीही तिच्या कार्यक्रमांना तुफान गर्दी होताना दिसत आहे.
गौतमी पाटीलने एका तरुणाला मारहाण केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याची घटना ताजी असतानाच, आता बहिरवाडी (ता. खेड) येथे एका कार्यक्रमात तरुणांनी धुडघुस घालून कार्यक्रम बंद पडला. मग गावातील महिला आक्रमक झाल्या आणि त्यांनी हातात काठ्या घेऊन टवाळखोरांना चांगलाच धडा शिकविला आणि बंद पडलेला कार्यक्रम पुन्हा सुरु केला.
बहिरवाडी येथे गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात प्रेक्षकांनी नृत्याला भरभरुन प्रतिसाद देत जल्लोष केला. मात्र काही तरुणांनी कार्यक्रमात धुडघुस घालण्याचा प्रयत्न केला. यावेळी गौतमी आणि आयोजकांना कार्यक्रम थांबविण्याची वेळ आली. यानंतर गावच्या महिला आक्रमक झाल्या आणि त्यांनी हातात काठी घेत तरुणांना दम देण्यास सुरुवात केली. यावेळी गावातील महिला तरुणांच्या गर्दीत घुसल्या आणि त्यांनी काठी उगारुन त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला.
एका व्हायरल व्हिडीओमुळे गौतमी पाटील रातोरात प्रसिद्धीच्या झोतात आली होती. पण गेल्या काही दिवसांपासून ती वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. सोशल मीडियावर तिला प्रचंड ट्रोलिंगचा सामना करावा लागत असला तरी तिचा खूप मोठा चाहतावर्ग आहे. आपल्या नृत्याच्या तालावर प्रेक्षकांनाही ठेका धरायला लावणाऱ्या गौतमी पाटीलच्या कार्यक्रमांना तुफान गर्दी होत असते.
दरम्यान, तरुणाईमध्ये गौतमी पाटीलची खूप मोठ्या प्रमाणावर क्रेझ आहे. मध्यंतरी गौतमीच्या एका कार्यक्रमात झालेल्या चेंगराचेंगरीमुळे एका चाहत्याच्या मृत्यू झाला होता. त्यानंतर कार्यक्रमात चाहत्यांनी थेट स्टेजवर चढून धिंगाणा घातल्याचा प्रकारही घडला होता. या सर्व प्रकारांमुळेच आता गौतमीच्या लावणी कार्यक्रमांवर बंदी घालण्याची मागणी केली जात आहे.
गौतमी पाटील अश्लील डान्स करत असल्याचा आरोप अनेकांनी केला आहे. प्रतिभा शेलार यांनी गौतमी पाटील हीच्या विरोधात तक्रार दाखल केल्यानंतर सातारा कोर्टाने तिच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.