पुणे प्राईम न्यूज डेस्क: आमिर खान आणि किरण राव यांचा ‘लापता लेडीज’ हा चित्रपट सध्या चर्चेत आहे, त्यामागील कारण म्हणजे ऑस्कर २०२५ मध्ये या चित्रपटाची एंट्री. हा चित्रपट आमिर खानची माजी पत्नी किरण राव यांनी दिग्दर्शित केला आहे, ज्यामध्ये रवी किशन, प्रतिभा रंता, नितांशी गोयल, स्पर्श श्रीवास्तव आणि छाया कदम सारखे दिग्गज कलाकार आहेत, पण तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, आमिर खानने देखील या चित्रपटासाठी ऑडिशन दिले होते, पण त्याला नाकारण्यात आले.
‘लापता लेडीज’ मध्ये सर्वच कलाकारांनी आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली. कमी बजेटमध्ये चांगली कमाई करणारा हा चित्रपट यावर्षी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटात एक व्यक्तिरेखा साकारण्याची इच्छा खुद्द आमिर खानने व्यक्त केली होती, ज्यासाठी त्याने ऑडिशनही दिले होते. मात्र, चित्रपटासाठी तो खूप मोठा स्टार असल्याचे सांगत त्याला नकार देण्यात आला. त्यानंतर ते पात्र रवी किशनने साकारले. याचा खुलासा खुद्द आमिर खानने केला आहे. आमिर खान म्हणाला की, ‘कथा खरोखरच चांगली होती आणि त्यात एक उत्तम पात्रही आहे. मला वाटले की, ही कथा मी किरणला द्यावी, कदाचित तिला आवडेल’. रवी किशनने साकारलेली ठाणेदाराची भूमिका आमिर खानला करायची होती.