मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री जया बच्च्न यांच्या आईचे निधन झाल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. मात्र, हे वृत्त खोटं असल्याची माहिती बच्चन कुटुंबीयांकडून देण्यात आली आहे. जया बच्चन यांची आई इंदिरा भादुरी या जिवंत असून त्यांची प्रकृतीसुद्धा ठीक आहे, असं बच्चन कुटुंबाने सांगितलं आहे.
बच्चन कुटुंबीयांकडून स्पष्टीकरण
“सध्याच्या घडीला जया बच्चन आणि त्यांच्या कुटुंबात कोणाचंही निधन झालेलं नाही. आम्ही चाहत्यांना विनंती करतो की त्यांनी भ्रामक चर्चांवर विश्वास ठेवू नये. दिशाभूल करणाऱ्या आणि विश्वासार्ह नसलेल्या माहितीबद्दल योग्य पडताळणी करून घ्या. अशा अफवा पसरतात तेव्हा कुटुंबास प्रचंड त्रास होतो. त्यामुळे खोट्या बातम्या पसरवून कुटुंबाची अडचण आणखी वाढवू नका. आम्ही प्रत्येकाला विनंती करतो की त्यांनी बच्चन कुटुंबीयांच्या प्रायव्हसीचा आदर करावा आणि भविष्यात विश्वसनीय स्रोताकडून मिळालेल्या माहितीवरच विश्वास ठेवावा”, असं बच्चन कुटुंबीयांनी स्पष्ट केलं आहे.
दरम्यान, जया बच्चन यांची आई इंदिरा भादुरी यांचं वयाच्या 94 व्या वर्षी निधन झाल्याच्या अफवा पसरल्या होत्या. इतकंच नव्हे तर गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती ठिक नसून त्यांनी भोपाळमध्ये अखेरचा श्वास घेतल्याचं म्हटलं जात होतं. या खोट्या वृत्तांवर काही सेलिब्रिटींनी संताप व्यक्त केला आहे.