पुणे प्राईम न्यूज डेस्क: या शनिवारी, सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील इंडियन आयडॉल 14 या लोकप्रिय गायन रियालिटी शोमध्ये उर्मिला मातोंडकर या बॉलीवूड सुंदरीचे स्वागत करण्यात येणार आहे. ‘सेमी-फाइनल्स विथ उर्मिला’ या विशेष भागात टॉप 6 मध्ये आपले स्थान पक्के करण्यासाठी सगळे स्पर्धक एकापेक्षा एक सरस कामगिरी करताना दिसतील. हे स्पर्धक चित्रपट उद्योगातील उर्मिलाचा प्रवास दर्शविणारी सुरेल गाणी सादर करतील आणि उर्मिलाला तिच्या सुंदर भूतकाळाच्या सफरीवर घेऊन जातील. भारावलेली उर्मिला आपल्या प्रवासातील काही रोचक किस्से प्रेक्षकांना सांगणार आहे.
यावेळी ‘बहुत खूबसूरत हो’ (खूबसूरत) आणि ‘इस प्यार से मेरी तरफ ना देखो’ (चमत्कार) ही गाणी सादर करून राजस्थानचा पियुष पंवार पुन्हा एकदा बाजी मारेल. त्याच्या परफॉर्मन्सने प्रभावित झालेली उर्मिला म्हणाली, “तू अप्रतिम गायलास. तुझा आवाज रफीसाहेबांसारखाच मुलायम आहे, जो आजकाल दुर्मिळ झाला आहे.”
या गाण्याविषयी आणि आपला सह-कलाकार शाहरुख खान याच्याविषयी बोलताना उर्मिला म्हणाली, “हे गाणे (इस प्यार से मेरी तरफ ना देखो) कुमार सानू आणि अलका याज्ञिकने म्हटले होते आणि लोकांना ते खूप आवडले होते. पियुष तुझा प्रयत्न खूप छान होता. शाहरुख खानसोबत हे गाणे चित्रित केले, त्याची मला आठवण झाली. शाहरुख केवळ एक उत्कृष्ट अभिनेता नाही, तर एक चांगला माणूस देखील आहे. तो खूप चांगला अभिनेता आहे, त्याने रंगभूमीवर देखील काम केले आहे. मुख्य म्हणजे सुरुवातीपासूनच तो खूप विनम्र आहे. त्याचा प्रभाव असा काही असतो की, त्याच्यासोबत त्याच्या सह-कलाकारांना मोकळे वाटते. मला वाटते, ज्या लोकांना त्याच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली, ते नशीबवान आहेत.”
इतकेच नाही, तर पियुष ‘रंगीला’ चित्रपटातील ते गाजलेले दृश्य मंचावर साकारताना दिसेल. पियुषला आपल्यातील अभिनय क्षमतेचा शोध इंडियन आयडॉलमध्येच लागला आहे. पियुष आपल्या गाण्यानेच नाही तर अभिनयाने देखील उर्मिलाला प्रभावित करताना दिसेल.