मुंबई: एक अभूतपूर्व सहयोग होऊन सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील इंडियन आयडॉल 14 या प्रतिष्ठित सिंगिंग रियालिटी शोच्या स्पर्धकांना ‘फाइटर’ या ब्लॉकबस्टर चित्रपटातील ‘वंदे मातरम’ (फाइटर अँथम) या गीतासाठी पार्श्वगायन करण्याची संधी मिळाली. विशाल शेखर या सुप्रसिद्ध संगीतकार जोडीने हे गीत स्वरबद्ध केले आहे. वैभव गुप्ता (कानपूर), शुभदीप दास चौधरी (कोलकाता), दीपन मित्रा (कोलकाता), ओबोम तांगू (तुतिंग), उत्कर्ष वानखेडे (नागपूर) आणि पियुष पनवर (बालोत्रा, राजस्थान) या स्पर्धकांना हे जोशपूर्ण देशभक्ती गीत गाण्याची संधी मिळाली आणि अशा प्रकारे हिंदी संगीत क्षेत्रातील त्यांच्या प्रवासाचाही शुभारंभ झाला.
हे गीत आणि इंडियन आयडॉलच्या स्पर्धकांविषयी बोलताना संगीतकार विशाल ददलानी म्हणाला, “वंदे मातरम’ या ‘फाइटर’च्या अँथमसाठी इंडियन आयडॉलच्या स्पर्धकांना आपला आवाज देताना पाहून ऊर अभिमानाने भरून आला. या प्रतिभावान मुलांनी केवळ या मंचावर आपले गायन कौशल्य दाखवलेले नाही, तर ‘फाइटर’सारख्या मोठ्या चित्रपटाद्वारे पार्श्वगायन क्षेत्रात देखील पदार्पण केले आहे. आम्हाला (विशाल, शेखर) वाटते की, त्यांचे पॅशन, निष्ठा आणि टवटवीत प्रतिभा या संपूर्ण स्पर्धेत नजरेत भरणारी होती आणि आता त्यांचा आवाज अगदी तयार झाला आहे, जो मोठ्या पडद्यावर प्रेक्षकांना आकर्षित करण्यासाठी आवश्यक असतो. ही संधी म्हणजे त्यांच्या कष्टाची पावती तर आहेच, शिवाय तो त्यांच्या सांगीतिक प्रवासातील महत्त्वाचा टप्पा आहे. याबद्दल हृतिक रोशन (ज्याची ही कल्पना होती) आणि सिद्धार्थ आनंद यांना मी धन्यवाद देतो, ज्यांनी या नवीन, उभरत्या कलाकारांना प्रोत्साहन दिले.
या संधीविषयी बोलताना कानपूरचा वैभव गुप्ता म्हणाला, “विशाल-शेखर यांच्याकडून एवढी मोठी संधी मिळाल्याबद्दल मी कृतज्ञ आहे. आमच्यावर विश्वास दाखवून त्यांनी आम्हाला ‘वंदे मातरम’ हे फाइटर अँथम सादर करण्याची संधी दिली. आम्ही जेव्हा हृतिक रोशनच्या एंट्रीसाठी ‘सुजलाम सुफलाम’ परफॉर्म केले, तेव्हा याची सुरुवात झाली. या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी तो आमच्या शोमध्ये आला होता. त्याला आमचा परफॉर्मन्स आवडला आणि त्याने विशाल यांना विनंती केली की, त्यांनी आम्हाला या चित्रपटात परफॉर्म करण्याची संधी द्यावी. विशाल-शेखर यांनी आम्हाला 2024 मधील हे प्रतीक्षित गाणे रेकॉर्ड करण्यासाठी स्टुडिओमध्ये बोलावले. त्या व्यतिरिक्त मी इंडियन आयडॉल परिवार आणि सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनचा देखील आभारी आहे, कारण त्यांनी आमच्यावर हा विश्वास दाखवला.”
राजस्थानच्या पियुष पनवरने म्हटले की, आमच्यावर इतका विश्वास दाखवल्याबद्दल मी संगीतकार जोडी विशाल-शेखरचा खूप ऋणी आहे. आणि दुसरे म्हणजे हृतिक रोशन यांचा खूप आभारी आहे, कारण त्यांनी मला माझा लुक बदलण्यास खूप मदत केली. या नवीन लुकमुळे माझा आत्मविश्वास वाढला आहे आणि लगेच मला एवढ्या मोठ्या चित्रपटातील गीतासाठी गाण्याची संधी देखील मिळाली. स्पर्धा सुरू असतानाच ही संधी आम्हाला मिळाल्यामुळे आमच्या मनात नवीन स्वप्ने जागी झाली आहेत आणि भविष्यात चमकण्याची नवी आशा पालवली आहे. या प्रतिष्ठित शो चा स्पर्धक असल्याचा मला अभिमान वाटतो आणि जगभरात प्रसिद्ध असलेल्या या परीक्षकांसमोर परफॉर्म करताना मला धन्यता वाटते.”