Honey Singh Shalini Divorce : नवी दिल्ली : प्रसिद्ध रॅपर हनी सिंगनं घटस्फोटासाठी जो अर्ज केला होता अखेर दिल्ली कोर्टानं मंजूर केला आहे. दिल्ली कोर्टानं हनी सिंग आणि शालिनी तलवार यांच्या घटस्फोटाच्या अर्जाला परवानगी दिली आहे. मागील एक वर्षांपासून हे प्रकरण प्रलंबित होते. याकाळात दोघा पतीपत्नींकडून एकमेकांवर वेगवेगळ्या प्रकारचे आरोप होत होते. शालिनीनं हनी सिंगच्या विरोधात कौटूंबिक हिंसाचाराची याचिका दाखल केली होती. त्यानंतर हनी सिंगनं देखील शालिनीच्या विरोधात वेगवेगळे आरोप केले होते. गेल्या अनेक महिन्यांपासून या अर्जावर सुनावणी सुरु होती. तेरा वर्षांच्या संसारानंतर हनी सिंगनं पत्नी शालिनी तलवारपासून विभक्त होत आहे.
दिल्ली कौटूंबिक न्यायालयाचे मुख्य न्यायधीश परमजीत सिंग यांनी हा घटस्फोट मंजूर केला आहे. या पुढील काळात आपल्याला पत्नी शालिनीसोबत राहता येणार नाही. असे हनी सिंगने म्हटले होते. वकील इशान मुखर्जी यांनी हनी सिंगच्यावतीनं बाजू मांडली. त्यांनी या प्रकरणाविषयीची अतिरिक्त माहिती देण्यास नकार दिल्याचे सांगण्यात येत आहे. शालिनीनं यापूर्वी हनी सिंगकडे मोठ्या प्रमाणात पोटगीची मागणीही केली होती. त्यानंतर या प्रकरणाची चर्चा झाली होती. हनी सिंगनं देखील सोशल मीडियावर पोस्ट लिहून त्याविषयी चाहत्यांना काही गोष्टींबाबत खुलासे केले होते.
हनी सिंगकडून आपल्याला मोठ्या प्रमाणात मानसिक त्रास सहन करावा लागल्याचे शालिनीनं म्हटलं होते. म्हणून एक कोटींच्या पोटगी दिल्यास केस मागे घेण्याचा विचार करु असे पत्नी शालिनीकडून सांगण्यात आले होते. जानेवारी २०११ मध्ये त्या दोघांचा विवाह झाला होता. गेल्या काही वर्षांपासून त्यांच्यात वाद सुरू होते. त्यानंतर गेल्या वर्षी सप्टेंबर २०२२ मध्ये त्यांनी घटस्फोटासाठी अर्ज केला होता.