मुंबई : बॉलिवूड सुपरस्टार सलमान खानच्या घराबाहेर रविवारी पहाटे 4.55 वाजता गोळीबार करण्यात आला. वांद्रे येथील भाईजानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटसमोर दोन दुचाकीस्वारांनी 6 राऊंड फायर करत गोळीबार केला. हल्लेखोरांनी हवेत गोळीबार करून तेथून पळ काढला. मात्र, या घटनेत कोणीही जखमी झाल्याचे वृत्त नाही. आता हल्ल्याचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. व्हिडिओमध्ये दुचाकीवरून आलेले हल्लेखोर दिसत आहेत.
हल्ल्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सलमान खानशी फोनवर चर्चा केली. संवादादरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सलमान खानला सुरक्षा पुरवण्याचे पूर्ण आश्वासन दिले. सलमान खानशी बोलल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी मुंबई पोलिस आयुक्तांना सलमानची सुरक्षा वाढवण्याचे आदेश दिले. गोळीबार प्रकरणी मुंबईतील वांद्रे पोलिसांनी अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान हा गोळीबारा झाला तेव्हा सलमान खान घरीच होता. मुंबईचे डीसीपी राजतिलक रोशन यांनी सांगितले की, 15 ते 20 टीम तयार करण्यात आल्या असून या प्रकरणी काम करत आहेत. आम्ही प्रत्येक अँगलने तपास करत आहोत. आम्हाला अद्याप कोणतेही पत्र मिळालेले नाही. तसेच हल्ल्यात वापरण्यात आलेली दुचाकी कोणाची आहे, याबाबत आम्हाला कोणतीही माहिती मिळालेली नाही. ते लोक कोण होते, याची माहिती अद्याप मिळालेली नाही. यामध्ये कोणत्या टोळीचा सहभाग आहे का? हे आताच सांगता येणार नाही.
याआधीही सलमान खानला अनेकदा धमक्या आल्या आहेत. सलमान खानसोबतच्या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये दिसल्यामुळे पंजाबी गायक गिप्पी ग्रेवालच्या कॅनेडियन घरावर लॉरेन्स बिश्नोई टोळीने अनेक राऊंड फायर करत गोळीबार केला होता. तेव्हा नोव्हेंबर 2023 मध्ये सलमानला नवीनतम धमकी मिळाली. गिप्पी ग्रेवालच्या घरावरच्या गोळीबारानंतर हल्ल्याची जबाबदारी स्वीकारून सलमानला लॉरेन्स बिश्नोईच्या सोशल मीडिया पेजवरून धमकी देण्यात आली होती.