पुणे : विनोदवीर राजू श्रीवास्तव यांच्या चाहत्यांसाठी गुड न्यूज आहे. तब्बल 15 दिवस कोमात राहिल्यानंतर राजू श्रीवास्तव गुरुवारी शुद्धीवर आले आहेत. राजू एम्सच्या वैद्यकीय कर्मचार्यांशी हातवारे करत बोलले.
राजू श्रीवास्तव हॉटेलच्या जिममध्ये वर्कआउट करत होते. ट्रेडमिलवर व्यायाम करत असताना त्यांना छातीत दुखू लागले आणि ते खाली कोसळले. यानंतर राजू श्रीवास्तव यांना त्यांच्या जिम ट्रेनरने तातडीने रुग्णालयात नेले. तेव्हापासून राजू दिल्लीच्या एम्समध्ये डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार घेत आहेत.
कॉमेडियन सुनील पाल यांनी एक व्हिडिओ पोस्ट करत ही माहिती दिली आहे. राजू श्रीवास्तव शुद्धीवर आले असून देवाने आपल्या सगळ्यांची प्रार्थना ऐकली असे ते म्हणाले आहेत.
राजू यांचे मेहुणे आशिष श्रीवास्तव यांनीही सांगितले की, त्यांना पहिल्यांदाच शुद्ध आली. आज रुग्णालयात राजू यांनी नर्सला हातवारे करून विचारले की, ते हॉस्पिटलमध्ये कसे आले? यावर एम्सच्या नर्स स्टाफने त्यांना एवढेच सांगितले की, तुम्ही भोवळ आल्याने कोसळले होते, म्हणूनच तुम्हाला हॉस्पिटलमध्ये आणले गेले.
यापूर्वी कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार बुधवारी अर्ध्या तासासाठी त्यांचा व्हेंटिलेटर काढण्यात आला होता. राजू यांचा व्हेंटिलेटरचा आधार काढण्याची ही दुसरी वेळ होती. यापूर्वी 15 ऑगस्ट रोजी डॉक्टरांनी 1 तासासाठी व्हेंटिलेटर काढले होते. त्यानंतर त्यांना ताप आला होता. त्यानंतर त्यांना पुन्हा व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले. तेव्हापासून ते व्हेंटिलेटरवर आहेत.
राजू श्रीवास्तव यांची मुलगी अंतरा हिने माध्यमांना वडिलांच्या प्रकृती माहिती दिली होती. तिने सांगितल्यानुसार, वडिलांची प्रकृती स्थिर आहे. त्यांच्या प्रकृतीत हळूहळू सुधारणा होत आहे.
राजू यांचे मोठे भाऊ सीपी श्रीवास्तव यांनी सांगितले की, ते गुडगावमधील त्यांच्या घरी सात दिवसांपासून रुद्राभिषेक करत आहेत. राजू यांची तब्येत लवकरात लवकर सुधारावी यासाठी संपूर्ण कुटुंब दिवसरात्र प्रार्थना करत आहे.
डॉक्टर त्यांच्यावर चांगल्या पद्धतीने उपचार करत आहेत. त्यांना नळीद्वारे दररोज दूध आणि ज्युस दिला जात आहे. मात्र, अद्याप ते शुद्धीवर आलेले नाहीत. न्यूरो फिजिओथेरपीद्वारे त्याच्या मेंदूला ऑक्सिजनचा पुरवठा सुरु करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.