मुंबई : अगदी लहानांपासून ते वृद्धांपर्यंत विनोदी अभिनय क्षेत्रात तरुणाईच्या गळ्यातील ताईत म्हणून अभिनेता गौरव मोरेची (Gaurav More) ओळख आहे. महाराष्ट्राची हास्य जत्रा (Maharashtrachi Hasyajatra) या लोकप्रिय शोमुळे गौरव घराघरात पोहोचला. विनोदाचं अचूक टायमिंग साधत त्याने हजारो प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. मात्र, आता गौरवने वैयक्तिक आयुष्यात एक मोठा निर्णय घेतला आहे. इन्स्टाग्राम (Instagram) पोस्ट शेअर करत गौरवने हास्यजत्रा सोडल्याचं जाहीर केलं आहे.
संपूर्ण महाराष्ट्राला खळखळून हसवणारा कार्यक्रम म्हणजे ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा.’ गौरवने महाराष्ट्राची हास्य जत्रा या शोच्या सेटचा व्हिडिओ शेअर करत तो हा शो सोडत असल्याची घोषणा केली. हा व्हिडिओ शेअर करताना गौरवने हृदयस्पर्शी कॅप्शन दिले. त्यांने लिहिले की, हॅलो एव्हरीवन मी गौरव मोरे पवई फिल्टरपाडा टना ना ट ना ना…..आरा बाप मारतो का काय मी….ये बच्ची…
रसिक प्रेक्षक आपण हया साध्या मुलाला खूप प्रेम दिलं. नाव दिलं, सन्मान दिलात त्याबद्दल मी आणि माझा परिवार आपले कायम ऋणी आहोत. मला सांगताना खूप वाईट वाटतयं की मी गौरव मोरे आपल्या लाडक्या मालिकेतून म्हणजेच “महाराष्ट्राची हास्य जत्रा” मधून आपला निरोप घेत आहे. माझ्या कामातून कुणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर मी त्या सगळ्यांची मनापासुन माफी मागतो.
महाराष्ट्राची हास्य जत्रा सोडून अगदीच काही दिवस झाले आणि नवा शो घेऊन तुमच्या भेटीला आलो माध्यम सारखं राहिलं आणि तुमचं प्रेम देखील ! असं म्हणतात ना नव्या प्रवासाची गोष्ट और असते आणि म्हणूनच नव्या प्रवासात नव्या शो साठी तुमचा खंबीर पाठिंबा कायम असावा. नवा प्रवास सुरू झाला आणि यातून देखील तुमच्या सारख्या रसिक प्रेक्षकांचं खळखळून मनोरंजन करणार आहे म्हणून तुमचा आशीर्वाद आणि शुभेच्छा प्रेम असच राहू दे.
महाराष्ट्राची हास्य जत्रा या लोकप्रिय शोमुळे गौरव घराघरात पोहोचला. सध्या तो हिंदी वाहिनीवरील मॅडनेस मचायेंगे इंडिया को हसायेंगे या कॉमेडी शो मध्ये दिसत आहे. मराठी प्रमाणेच गौरवने हिंदीतही प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली.