पुणे प्राईम न्यूज डेस्क: ‘सुशीला-सुजीत’ या १८ एप्रिल २०२५ रोजी प्रदर्शित होणाऱ्या बहुप्रतीक्षित चित्रपटाचे प्रसारगीत अर्थात प्रोमोशनल साँग प्रकाशित करण्यात आले. यावेळी गश्मीर महाजनी आणि अमृता खानविलकर यांनी या गाण्यावर नृत्य सादर केले. या सोहळ्यात चित्रपटाचे निर्माते स्वप्नील जोशी, मंजिरी ओक, प्रसाद ओक, नीलेश राठी तसेच चित्रपटाचे संगीत दिग्दर्शक वरुण लिखते, गायक प्रवीण कुंवर आणि कविता राम, गीतकार मंदार चोळकर, पटकथा-संवाद लेखक अजय कांबळे, नृत्यदिग्दर्शक मेहुल गदानी आणि इतर कलाकार/तंत्रज्ञ उपस्थित होते.
बिग ब्रेन प्रॉडक्शन्स आणि पंचशील एंटरटेन्मेंटने या चित्रपटाची निर्मिती केली आहे. चित्रपटाचे वितरण पॅनोरमा स्टुडिओजचे असून, चित्रपटाची कथा व दिग्दर्शन प्रसाद ओक यांचे आहे. प्रसाद ओक, मंजिरी ओक, स्वप्नील जोशी, सिनेमॅटोग्राफर संजय मेमाणे हे पहिल्यांदाच एकत्र येऊन चित्रपटाची निर्मिती करणार आहेत. सोबत निलेश राठीसुद्धा आहेत. प्रसाद ओक दिग्दर्शक आणि संजय मेमाणे सिनेमॅटोग्राफर हे एक यशस्वी कॉम्बिनेशन मानले जात आहे. या वेळी प्रसाद ओक म्हणाला की, सोनाली आणि स्वप्नील हे थोडेसे वेगळे कास्टिंग या चित्रपटासाठी आम्ही केले आहे.
स्वप्नील, सोनालीबरोबर या चित्रपटात अमृता खानविलकरसुद्धा आहे, हे दोन आठवड्यांपूर्वी आम्ही प्रेक्षकांसमोर आणले आणि आता चित्रपटाचे प्रोमोशनल साँग प्रदर्शित करत आहोत. रसिकांनी चित्रपट कधी प्रदर्शित होत आहे, याची विचारणा सुरू केली आहे. आम्हाला खात्री आहे की लोक चित्रपटाला पसंतीची पावती देतील.