पुणे : ज्येष्ठ अभिनेत्री आशा काळे यांना ‘गदिमा प्रतिष्ठान’ तर्फे दरवर्षी देण्यात येणारा गदिमा स्मृती पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. तर गृहिणी सखी सचिव हा पुरस्कार अभिनेत्री प्रिया बेर्डे यांना जाहीर करण्यात आला आहे. पुरस्काराबद्दलची माहिती गदिमा प्रतिष्ठानचे कार्यकारी विश्वस्त आनंद माडगूळकर यांनी दिली.
आधुनिक महाराष्ट्राचे वाल्मिकी ग. दि. माडगूळकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त 14 डिसेंबर रोजी टिळक स्मारक मंदिर येथे सायंकाळी पाच वाजता होणाऱ्या कार्यक्रमात प्रसिद्ध नाटककार श्रीनिवास भणगे यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.
मराठीबरोबरच सिनेविश्वातही स्वत:ची ओळख निर्माण करणा-या अभिनेत्री प्रिया बेर्डे यांना गृहिणी सखी सचिव या पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे. तर मराठी सिनेविश्वात स्वत:ची ओळख निर्माण करणा-या तरुण मंडळींना चैत्रबन पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. गीतकार क्षितीज पटवर्धन या पुरस्कार सोहळ्याचे ते मानकरी आहेत. विज्ञा प्रज्ञा पुरस्काराच्या मानकरी गायिका मनीषा निश्चल आहेत. तसेच ज्येष्ठ साहित्यिक न.म.जोशी यांचा विशेष सत्कार होणार आहे.
दरम्यान, आशा काळे यांनी मराठी सिनेमे, नाटक आणि काही मालिकांमध्येही काम केलं होतं. आपल्या सोज्वळ रुपानं आणि दमदार अभिनयानं आशाताईंनी प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान मिळवलं आहे. मराठी सिनेमांबरोबर आशा काळे यांनी मराठी नाटकांतही काम केलं आहे.