Film News : मुंबई : ‘गदर 2’च्या रिलीजने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. सनी देओल आणि अमिषा पटेल यांच्या चित्रपटाने पुन्हा एकदा तीच जादू निर्माण केली आहे जी 22 वर्षांपूर्वी चित्रपटगृहांमध्ये पाहायला मिळाली होती. तिकीट खिडकीवर प्रेक्षकांची गर्दी, सिनेमागृहांमध्ये वाजणाऱ्या शिट्ट्या, ‘गदर 2’च्या सुपर यशाची साक्ष देत आहेत. (Film News)
चित्रपटगृहांमध्ये प्रेक्षकांची गर्दी……
11 ऑगस्ट रोजी प्रदर्शित झालेल्या ‘गदर 2’ने आपला पहिला आठवडा यशस्वीरित्या पूर्ण केला. या चित्रपटाने 7 दिवसांत बंपर कमाई केली आहे. पण तरीही सिनेमाचा 300 कोटी रुपयांचा टप्पा अगदी थोडक्याने चुकला आहे. आठवड्याच्या शेवटच्या दिवशी गुरुवारी चित्रपटाच्या कमाईत 28 टक्क्यांची घसरण नोंदवण्यात आली आहे.
अनिल शर्मा दिग्दर्शित ‘गदर 2’ची बॉक्स ऑफिसवर अक्षय कुमारच्या ‘OMG 2’शी टक्कर झाली. गुरुवारी पहिल्या आठवड्याच्या शेवटच्या दिवशी दोन्ही चित्रपटांच्या कमाईत घसरण झाली. वीकेंड आणि स्वातंत्र्यदिनाच्या सुट्टीनंतर एक दिवस आधी बुधवारी ‘गदर 2’ च्या कमाईत सुमारे 41 टक्क्यांनी घट झाली. तर गुरुवारी पुन्हा एकदा त्याच्या कमाईत 28 टक्क्यांची घट झाली आहे. (Film News)
1971 च्या भारत-पाकिस्तानच्या वैमनस्यावर आधारित, ‘गदर 2’ मध्ये सनी देओल आणि अमिषा पटेल यांच्यासह उत्कर्ष शर्मा, सिमरत कौर, मनीष वाधवा आणि गौरव चोप्रा देखील आहेत. यावेळी तारा सिंह आणि सकिना यांची कथा त्यांचा मुलगा जीतेला पाकिस्तानातून परत आणण्याची आहे. बॉक्स ऑफिसवर ‘गदर 2’ ने पहिल्या दिवसापासून विक्रमी कमाई केली आहे. (Film News)