Film News : मुंबई : सुभेदार तान्हाजी मालुसरे रायबाच्या लग्नाचं आमंत्रण घेऊन रायगडावर गेले होते. स्वराज्यावर आलेला बाका प्रसंग ओळखून ते स्वतः कोंढाण्याच्या मोहिमेवर जायला सज्ज झाले. बेलभंडारा उचलून, हात उंचावून ‘आधी लगीन कोंढाण्याचं, मग माझ्या रायबाचं’ अशी शपथ त्यांनी घेतली. स्वामीनिष्ठेचं अजोड उदाहरण असलेला हा प्रसंग प्रत्येक शिवभक्ताच्या हृदयावर कायमचा कोरला गेलेला आहे. तो प्रसंग हुबेहुब डोळ्यांसमोर उभं करणारं ज्येष्ठ चित्रकार दीनानाथ दलाल यांच्या कुंचल्यातून अवतरलेलं चित्र आपण बालपणी इतिहासाच्या पाठ्यपुस्तकात पाहिलं आहे.
तान्हाजी मालुसरेंची व्यक्तिरेखा
शिवकालीन इतिहास सांगणाऱ्या अनेक पुस्तकांमध्ये याचा समावेश करण्यात आला आहे. त्या गाजलेल्या चित्रावरून प्रेरित होऊन नवीन पिढीसाठी हा प्रसंग ‘सुभेदार’ या महत्त्वाकांक्षी आगामी चित्रपटात चलचित्ररूपात पाहायला मिळणार आहे. लेखक-दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर आणि त्यांच्या टिमने प्रचंड मेहनतीने ‘सुभेदार’च्या माध्यमातून शिवकालीन इतिहासातील एक सुवर्णपान रसिकांसमोर उलगडण्याचं काम केलं आहे. येत्या 18 ऑगस्टला ‘सुभेदार’ हा चित्रपटात संपूर्ण राज्यात प्रदर्शित होणार आहे. यापूर्वी हा चित्रपट 25 ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार होता. मात्र, आता त्याच्या प्रदर्शनाची तारीख बदलण्यात आली आहे. (Film News)
या चित्रपटात अजय पूरकरांनी सुभेदार तान्हाजी मालुसरेंची व्यक्तिरेखा साकारली आहे. त्यांच्या जोडीला चिन्मय मांडलेकर, मृणाल कुलकर्णी, स्मिता शेवाळे, अभिजीत श्वेतचंद्र, शिवानी रांगोळे, समीर धर्माधिकारी, उमा सरदेशमुख, अर्णव पेंढारकर आदी कलाकारांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा टीझर आणि पोस्टर समोर आले होते. यात पोस्टरमध्ये तानाजी मालुसरेंच्या कुटुंबाची झलक पाहायला मिळाली होती. यात अभिनेते अजय पुरकर हे तानाजी मालुसरे हे पात्र साकारताना दिसत आहेत. (Film News)