मुंबई : जेव्हा टीव्हीवर कोणत्याही कॉमेडी शोचा उल्लेख केला जातो तेव्हा सर्वात पहिले नाव येतं ते सब टीव्हीचा प्रसिद्ध शो ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या शोचं. या शोमधील सर्वच कलाकार आपल्या अभिनयातून स्वत:चा ठसा उमटवत आहेत. पण याच शोमधील एक कलाकार असा आहे जो एकेकाळी नोकराच्या भूमिकेसाठी फक्त 50 रुपये घ्यायचा. पण आज हा कलाकार इतका प्रसिद्ध झाला की त्याच्याकडे कोट्यवधींची संपत्ती आहे.
‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मधील सर्वात लोकप्रिय कलाकार जेठालाल अर्थात दिलीप जोशी यांच्याबाबत आपण बोलत आहोत. दिलीप जोशी यांनी सुरुवातीच्या दिवसांत अत्यंत संघर्ष, कष्ट केले. एक काळ असा होता की त्यांना एक वर्षे काम नव्हते. मग त्यांनी अभिनय सोडण्याचा निर्णयही घेतला होता. पण जेव्हा तारक मेहताची ऑफर आली, तेव्हा त्यांचे नशीबच पालटले.
गुजरातमधील पोरबंदर येथे जन्मलेल्या दिलीप जोशी यांनी मोठ्या संघर्षानंतर नाव मिळवलं. त्यांनी बॅक स्टेज कलाकार म्हणून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. ज्यासाठी त्यांना फक्त 50 मिळायचे. 1989 मध्ये ‘मैंने प्यार किया’ या चित्रपटात सलमान खानच्या घरी नोकर असलेल्या रामूची भूमिका त्यांनी केली होती. मात्र, या भूमिकेत त्यांना फारशी ओळख मिळाली नाही. पण खऱ्या अर्थाने त्यांना प्रसिद्धी, ओळख मिळाली 2008 नंतर, जेव्हा तारक मेहता का उल्टा चष्मा हा शो सुरु झाला. तेव्हापासून ते आजपर्यंत दिलीप जोशी चांगलेच प्रसिद्ध आहेत.