हरियाणा : प्रसिद्ध डान्सर सपना चौधरीसह तिचा भाऊ व आई यांनी हुंड्यात ‘क्रेटा’ कारची मागणी व मारहाण केल्याचा आरोप सपना चौधरीच्या वहिनीने केला आहे. याप्रकरणी तिने पलवल पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून त्यानुसार तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
सपना चौधरी, तिचा भाऊ कर्ण आणि आई असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सपना चौधरीचा भाऊ कर्ण याचा नजफगड, दिल्ली येथील रहिवासी असलेल्या तरुणीशी सन २०१८ साली विवाह झाला होता. लग्न झाल्यानंतर सपना चौधरीच्या वाहिनीचा हुंड्यासाठी छळ केला जात होता आणि अनेकवेळा तिच्यावर अत्याचार झाल्याचा गंभीर आरोप केला आहे.त्यानंतर विवाहितेला मुलगी झाल्यावर सासरच्यांनी ‘क्रेटा’ कार मागायला सुरुवात केली.
वडिलांनी तीन लाख रुपये रोख आणि सोन्या-चांदीचे दागिने व कपडे दिले, मात्र तरीही सासरच्या लोकांची हुंड्याची मागणी पूर्ण झाली नाही. त्यांनी क्रेटा कार आणण्यासाठी महिलेचा छळ सुरू केला. पतीने दारूच्या नशेत पिडीतेवर २६ मे २०२० मध्ये अत्याचार केला आणि अनैसर्गिक संबंध ठेवले. सुमारे सहा महिन्यांपूर्वी ती पलवल येथील वडिलांच्या घरी आली होती. त्यानंतर पोलीस ठाण्यात तक्रार केली.
दरम्यान, सध्या पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून आठवडा होऊन गेल्यानंतरही अटक करण्यात आलेली नाही.
डीएसपी सतेंदर या संपूर्ण प्रकरणाचा कसून तपास करत असून आरोप निश्चित झाल्यानंतर आरोपींना अटक करण्यात येईल, असे सांगितले आहे. सदर वृत्त एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त प्रसिद्ध केले आहे.