दिल्ली : प्रसिद्ध कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांना हृदयविकाराचा झटका आला आहे. त्यांच्यावर दिल्लीतील एम्स या सरकारी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, राजू श्रीवास्तव हे हॉटेलच्या जीममध्ये वर्कआउट करीत होते. ते ट्रेडमिलवर व्यायाम करत होते. यावेळी धावत असताना त्यांच्या छातीत दुखू लागलं आणि ट्रेडमिलवरून खाली कोसळले. त्यांना दिल्लीतील एम्स या सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पण आता त्यांची प्रकृती सुधारते आहे. लवकरच त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळण्याची शक्यता आहे परंतु पुढील ४८ तास त्यांना निरीक्षणाखाली ठेवण्यात येणार असल्याची माहितीही समोर आली आहे.
राजू श्रीवास्तव हे प्रसिद्ध कॉमेडियन आहेत. ते उत्तर प्रदेश चित्रपट विकास परिषदेचे अध्यक्षही आहेत. त्यांनी अनेक चित्रपट आणि टीव्ही शोमध्ये काम केले आहे. वर्षानुवर्षे राजू श्रीवास्तव आपल्या कॉमेडीने लोकांना हसवत आहेत. राजू श्रीवास्तव यांना लहानपणापासूनच कॉमेडियन बनायचे होते आणि त्यांनी त्यांचे स्वप्न पूर्णही केले. राजूने आपल्या करिअरची सुरुवात स्टेज शोपासून केली.
दरम्यान, कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांना हृदयविकाराचा झटका आल्याचे बातमी कळताच त्यांच्या चाहत्यांमध्ये चितेंचे वातावरण पसरले आहे. सोशल मीडियावर पोस्ट करून प्रत्येकजण राजू श्रीवास्तव यांच्या आरोग्यासाठी प्रार्थना करत आहे. राजू श्रीवास्तव लवकर बरे व्हावेत अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली आहे.